हार-फूल यांवरील निर्बंधांविषयी धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती ! – राधाकृष्ण विखे पाटील, महसूलमंत्री

शिर्डी – शिर्डी येथील साईबाबा मंदिरात असलेली हार-फूल यांवरील बंदी कायम असून याविषयी सर्वंकष धोरण ठरवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ३० दिवसांत या समितीला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या समितीचा अंतिम अहवाल आल्यावर शासनस्तरावरून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले, ‘‘शहरात सोनसाखळी चोरी, अवैध व्यवसाय, भाविकांची लूट, चरस-गांजा विक्री यांसारख्या अनेक गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. पोलिसांनी गुन्हेगारांचे त्वरित उच्चाटन करावे. शहरातील अतिक्रमणांवर शिर्डी नगर परिषदेने त्वरित कार्यवाही करण्यासाठी पावले उचलावीत.’’