१८.११.२०२१ या दिवशी श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी (वय ८० वर्षे) यांचा रामनाथी आश्रमात सहस्रचंद्रदर्शन शांती विधी झाला. विधीपूर्वी, विधीच्या वेळी आणि विधीनंतर त्यांची मुलगी कु. तृप्ती कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
श्री. देवदत्त कुलकर्णी यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !
श्री. देवदत्त कुलकर्णी यांचा श्रावण कृष्ण त्रयोदशी (२५.८.२०२२) या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त या अनुभूती येथे देत आहोत.
श्री. देवदत्त गोपाळ कुलकर्णी यांच्या सन्मानाच्या वेळी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची २ छायाचित्रे भेट दिल्यानंतर त्यांचा भाव पुष्कळ जागृत होणेप.पू. डॉक्टर, या काही मासांत बाबांच्या मनाची निर्मळता, भावावस्था, आनंदावस्था आणि कृतज्ञताभाव यांत वाढ होत असल्याचे लक्षात आले आहे. त्याचसह ‘त्यांचे वागणे, बोलणे इत्यादी लहान मुलासारखे होत आहे’, असेही वाटते. सहस्रचंद्रदर्शन शांती विधीच्या वेळी बाबांच्या सन्मानाच्या वेळी त्यांना तुमची २ छायाचित्रे भेट दिली होती. ती छायाचित्रे पाहून बाबांचा पुष्कळ भाव जागृत झाला आणि त्यांनी ती छायाचित्रे हृदयाशी धरली. लहान मूल जसे त्याला मिळालेली नवीन वस्तू सर्वांना दाखवते, तसे बाबा ती छायाचित्रे आश्रमातील बहुतेक जणांना दाखवत आहेत. प.पू. डॉक्टर, बाबांची ही स्थिती केवळ तुमच्याच कृपेमुळे आहे. प.पू. डॉक्टर, बाबांचे म्हातारपण केवळ तुमच्याच कृपेमुळे आश्रमात आनंदाने व्यतीत होत आहे. ‘बाबांमध्ये एवढा अमूलाग्र पालट घडवल्याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता कशी व्यक्त करू ?’, हेच कळत नाही. – कु. तृप्ती कुलकर्णी |
श्री. देवदत्त कुलकर्णी यांची आध्यात्मिक पातळी चांगली असणे आणि त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला भाव यांमुळे त्यांच्या संदर्भात इतरांना आलेल्या अनुभूती
कु. तृप्ती : प.पू. डॉक्टर, आम्ही साधनेला नवीनच आरंभ केला होता, तेव्हा माझ्या शाळेतील मैत्रिणी तुम्हाला ओळखतही नव्हत्या. आम्हालाही तुमची केवळ ‘संत असलेले एक डॉक्टर’ एवढीच ओळख होती. तेव्हा तुमच्या डोक्याभोवती वलय असलेले छायाचित्र आम्ही घरी लावले होते. ते पाहून माझ्या मैत्रिणींनी मला विचारले, ‘‘तुझ्या बाबांचे असे छायाचित्र का लावले आहेस ?’’ तेव्हा मी त्यांना ‘‘ते डॉ. आठवले यांचे छायाचित्र असून ते संत आहेत’’, असे सांगितले होते.
तेव्हापासून अनेक साधकांना तुमच्यात आणि बाबांमध्ये साम्य वाटते. खरे स्थुलातून पहाता तुमच्या दोघांची शरीरयष्टी, वर्ण इत्यादी सर्वच गोष्टींत भेद आहे, तरीही सर्वच साधकांना बाबांना पाहून तुमचाच भास होण्याचे कारण काय ? अगदी बालसाधकांनाही असेच जाणवते. हल्ली तर साधकांना असे जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण काय ?
(परात्पर गुरु) डॉ. आठवले : बाबांची आध्यात्मिक पातळी चांगली असल्यामुळे इतरांना त्यांच्या छायाचित्राच्या संदर्भात वरील अनुभूती आली.
कु. तृप्ती : आध्यात्मिक पातळी अन्य साधकांचीही आहे; पण बाबांच्याच संदर्भात साधकांना असे जाणवण्याचे कारण काय ?
(परात्पर गुरु) डॉ. आठवले : बाबांच्यात असलेल्या भावामुळे साधकांना अशी अनुभूती आली.
१. विधीपूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. ‘बाबांची ‘यू.ए.एस्.’ची चाचणी करायला हवी’, या विचाराकडे कु. तृप्ती हिने दुर्लक्ष करूनही देवाने अन्य साधिकेच्या मनात त्यासंबंधी विचार घातल्याने त्यांची यू.ए.एस्. ची चाचणी होणे : विधीच्या आधी २ दिवस माझ्या मनात विधीपूर्वी आणि विधीनंतर बाबांवर झालेला परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी त्यांची यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे चाचणी करायला हवी’, हा विचार आला होता; पण ‘यू.ए.एस्. ची चाचणी आपण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापणार नसल्याने त्यांची यू.ए.एस्. चाचणी करायला नको’, असे मी मनानेच ठरवून त्या विचाराकडे दुर्लक्ष केले; पण विधीच्या आदल्या रात्री ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मंजिरी आगवेकर यांनी मला ‘‘विधीपूर्वी आणि विधीनंतर काकांची यू.ए.एस्. चाचणी करायला हवी का ?’’, असे संबंधित साधकांना विचारून घेण्यास सांगितले. तेव्हा मला ‘बाबांची यू.ए.एस्. चाचणी करायला हवी’, हा विचार माझा नसून देवानेच तो मला दिला होता आणि मी त्या विचाराकडे दुर्लक्ष केल्याने देवाने आता मंजिरीताईच्या माध्यमातून पुन्हा सांगितले आहे’, याची जाणीव झाली. त्यामुळे मी संबंधित साधकांना बाबांची यू.ए.एस्. चाचणी करण्यासंदर्भात विचारले. यू.ए.एस्. चाचणी करण्याचा निरोप किमान २ दिवस आधी संबंधित साधकांना द्यावा लागतो; पण त्या दिवशी आयत्या वेळी त्या साधकांना विचारूनही त्यांनी यू.ए.एस्. चाचणी करण्याची सिद्धता दर्शवली. त्यामुळे बाबांची यू.ए.एस्. चाचणी होऊ शकली.
१ आ. विधीच्या केवळ २ दिवसांच्या कालावधीत पाऊस थांबल्याने परात्पर गुरु डॉक्टरांचे पंचमहाभूतांवर असलेले नियंत्रण अनुभवता येणे : सहस्रचंद्रदर्शन शांती विधी १८.११.२०२१ या दिवशी होता आणि १७.११.२०२१ या दिवसापर्यंत केवळ गोव्यातच गडगडाटासह पुष्कळ पाऊस पडत होता. त्यामुळे ‘सोहळ्यासाठी पुण्याहून येणारे माझे काका-काकू, चुलत भाऊ आणि चुलत भाचा यांचे येणे रहित होते कि काय ?’, अशी आम्हा सर्वांनाच शंका वाटत होती; पण माझ्या काकांनी परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ‘आपण गोव्याला जाऊ. पुढचे परात्पर गुरु डॉक्टरच बघून घेतील’, असा विचार करून ते सगळे गोव्याला आले. ते सगळे १७.११.२०२१ या दिवशी गोव्याला येण्यासाठी निघाले. त्या दिवसापासून १९ तारखेपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबला आणि चक्क ऊन पडले. १९ तारखेला सकाळी ते सगळे पुण्याला जायला निघाले. ते बेळगावला पोचले आणि गोव्यात पुन्हा पाऊस चालू झाला. तेव्हा आम्हाला ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे पंचमहाभूतांवर कसे नियंत्रण आहे ? ते केवळ साधकांचीच नव्हे, तर साधकांच्या नातेवाइकांचीही कशी काळजी घेतात ?’, हेही अनुभवता आले. ‘आमचा प्रवास आणि सहस्रचंद्रदर्शन शांती विधी केवळ परात्पर गुरु डॉक्टरांमुळे निर्विघ्नपणे आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला’, असे माझ्या काका-काकूंनी बोलून दाखवले.’
२. विधीच्या दिवशी आलेल्या अनुभूती
२ अ. साधिकेने विधीसाठी साडी नेसून आणि दागिने घालूनही तिला आध्यात्मिक त्रास जाणवत नसल्याने ती सहजपणे सेवा करू शकणे : ‘मला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्याने मला कोणत्याही सणावाराला साडी नेसून दागिने घातले की, पुष्कळ आध्यात्मिक त्रास होतो. त्यामुळे माझे सेवेत लक्ष लागत नाही; पण ‘या विधीसाठी मी साडी नेसून दागिने घातले, तरीही मला अजिबात आध्यात्मिक त्रास न जाणवल्याने मी सहजपणे सेवा करू शकत होते’, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले.
२ आ. परात्पर गुरु डॉक्टरांना सहस्रचंद्रदर्शन सोहळा होणार असल्याचा निरोप देण्याची साधिकेची इच्छा पूर्ण होणे : विधीपूर्वी मला ‘परात्पर गुरु डॉक्टरांना बाबांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा होणार असल्याचा निरोप द्यावा’, असे वाटत होते; पण ‘वैयक्तिक गोष्ट त्यांना कशी सांगायची ?’, या विचाराने मी त्यांना निरोप देणे टाळत कहोते; पण विधीच्या दिवशी सकाळी परात्पर गुरु डॉक्टरांना कळवता आले. तेव्हा ‘माझ्या मनातील प्रत्येक विचाराकडे परात्पर गुरु डॉक्टरांचे कसे लक्ष आहे आणि ते माझी इच्छा कशी पूर्ण करतात ?’, याची मला प्रचीती आली अन् पुष्कळ कृतज्ञताही वाटली.
२ इ. परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे : विधीच्या वेळी मी मनातून परात्पर गुरु डॉक्टरांना ‘तुम्ही विधीला उपस्थित आहात ना ? असल्यास कुठे आहात ?’, असे विचारले. तेव्हा मला विधीच्या ठिकाणी जिथे बाबा बसले होते, त्यांच्यामागे परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे जाणवले.’
३. विधीच्या दुसर्या दिवशी आलेली अनुभूती
३ अ. ‘सोहळ्याच्या दुसर्या दिवशी अनेक साधकांनी बाबांच्या तोंडवळ्यावरील तेज वाढल्याचे आणि माझ्यावर असलेले त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण न्यून झाल्याचे सांगितले.’
४. कृतज्ञता
‘अनेक साधकांनी त्यांना तातडीच्या सेवा असूनही ‘विधीच्या वेळी आम्ही तुझ्या साहाय्याला येऊ’, असे मला स्वतःहून आवर्जून सांगितले आणि सोहळ्याच्या आदल्या दिवसापासून सोहळा संपेपर्यंतच्या सर्व सेवांमध्ये ते सहभागी झाल्याने मला कोणताही ताण न येता सोहळा निर्विघ्नपणे आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. त्या वेळी सर्वांमध्ये कुटुंबभावना निर्माण झाल्याचे जाणवत होते. अशा साधकांना देवाने मला सेवेसाठी दिल्यामुळे देवाच्या चरणी आणि साधकांप्रती कृतज्ञता !’
– कु. तृप्ती कुलकर्णी (श्री. देवदत्त कुलकर्णी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.११.२०२१)
श्री. देवदत्त कुलकर्णी यांना आलेल्या अनुभूती
१. भावावस्थेत रहाणे : ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी चालू असलेल्या ५ घंट्यांच्या (तासांच्या) कालावधीत माझी भावावस्था पूर्णवेळ टिकून होती आणि माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त होत होती.
२. अनोळखी महिलेने साधकाला भावपूर्ण नमस्कार करणे : ‘विधी संपल्यानंतर माझी यू.ए.एस्. चाचणी घेण्यासाठी मी आश्रमासमोरील रस्त्यावर एका आसंदीत बसलो होतो. सोहळ्याच्या वेळी मला घातलेला हार माझ्या गळ्यात होता. मला पाहून दुचाकीवरून जाणारी एक अनोळखी महिला काही अंतरावर जाऊन थांबली आणि तिने मी बसलेल्या ठिकाणापर्यंत चालत येऊन मला भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा ती म्हणाली, ‘‘बरं झालं आज तुमचं दर्शन झालं !’’ तेव्हा तिचे डोळे पाणावले होते. ते पाहून मला आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वच साधकांना आश्चर्य वाटले. तेव्हा आम्हा सर्वांना ‘कदाचित् तिला मी म्हणजे परात्पर गुरु डॉक्टर वाटलो असेन; म्हणून तिची भावजागृती झाली’, असे वाटले.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |