स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्यासाठी यज्ञमयी ज्वालेमध्ये १६ सहस्र राजपूत स्त्रियांसह (क्षत्राणींसह) आपल्या जीवनाची आहुती देणारी महाराणी पद्मिनी !

आज २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी महाराणी पद्मिनी यांनी यज्ञमयी ज्वालेमध्ये समर्पण केल्याचा दिवस आहे. त्या निमित्ताने…

महाराणी पद्मिनी जोहर करतांनाचे प्रतिकात्मक संग्रहित चित्र

१. राणी पद्मिनीला पाहू न शकल्यामुळे आणि तिच्याशी विवाह करण्यात अयशस्वी झाल्यामुळे अल्लाउद्दीनने रावल रत्नसिंहाला धोका देणे

‘वर्ष १३०२ मध्ये रावल रत्नसिंह चित्तौडचा महारावल (राजा) होता. अल्लाउद्दीन खिलजी रावल रत्नसिंहची सुंदर पत्नी महाराणी पद्मिनीशी विवाह करू इच्छित होता. त्यासाठी त्याने ८ मासांपर्यंत चित्तौडच्या किल्ल्याला सर्व बाजूंनी वेढा घातला होता; परंतु वेढा घालूनही त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर त्याने छळ आणि कपट करून रावल रत्नसिंहाशी तह करण्याचा (बोलणी करण्याचा) बहाणा केला आणि किल्ल्यात प्रवेश मिळवला. तहाची बोलणी करून परत जातांना रत्नसिंह शिष्टाचार म्हणून त्याला किल्ल्याच्या बाहेर सोडायला गेला. तेव्हा खिलजीने रावल रत्नसिंहाला धोका देऊन कैद केले. अलाउद्दीनला आरशात पद्मिनीचा चेहरा दाखवण्याचा प्रसंग निव्वळ कपोलकल्पित आहे. जो ‘पद्मावत’ नामक काल्पनिक पुस्तकातून प्रसारित केला गेला. राजपूत पुरुष छोट्या छोट्या गोष्टींसाठी तलवार उपसत असत आणि राजपूत स्त्रिया आपल्या सतीत्वाच्या रक्षणार्थ ‘जोहर’सारखा बलिदानी मार्ग निवडत होत्या. ते राजपूत म्लेंच्छ बादशहाला आपल्या महाराणीला दाखवण्यासारखे घृणास्पद कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे हे कथानक पूर्णतः अनैतिहासिक आहे. राणी पद्मिनीला पाहू न शकल्यामुळे आणि तिच्याशी विवाह करण्यात अयशस्वी झाल्यामुळे अल्लाउद्दीनने रावल रत्नसिंहाला धोका दिला होता.

२. गोरा आणि बादल यांचे बलीदान

रावलला कैद केल्यानंतर महाराणी पद्मिनीने आपला विवेक जागृत ठेवून अल्लाउद्दीनशी ‘कपटाशी कपट’ करण्याची म्हणजे ‘जशास तसे’ उत्तर देण्याची योजना आखली. तिने सैन्यात घोषित केले की, महाराणी पद्मिनी अल्लाउद्दीनकडे स्वतःला समर्पित करण्यासाठी पालखीत बसून येत आहे. या योजनेनुसार महाराणी पद्मिनीचे बंधू गोरा आणि तिचा भाचा बादल यांच्यासह ७०० पालख्या अल्लाउद्दीनच्या छावणीत पाठवण्यात आल्या. प्रत्येक पालखीत एक-एक सैनिक लपलेला होता आणि पालखी उचलणार्‍या भोयांच्या वेशातही सैनिकच होते. ‘पद्मिनीची पालखी येत आहे’, ही वार्ता ऐकून खिलजी अत्यंत प्रसन्न झाला. पद्मिनीने रत्नसिंहाला भेटण्याची इच्छा प्रकट केल्यावर त्याने रत्नसिंहाशी पद्मिनीची भेट घडवून आणली. रत्नसिंह या संधीचा लाभ घेऊन शत्रूच्या कैदेतून पसार झाला. सर्व सैनिक पालखीतून बाहेर आले. चित्तौडच्या ‘भाई खेडा’ नामक स्थानावर दोन्ही सैन्यामध्ये भयंकर युद्ध झाले. यामध्ये गोरा आणि बादल धारातीर्थी पडले. रावल रत्नसिंह आणि अनेक सरदारही रणभूमीवर युद्ध करतांना हुतात्मा झाले.

३. महाराणी पद्मिनी आणि चित्तोडचा पहिला जोहर

अशा स्थितीत २५.८.१३०३ या दिवशी आपल्या सतीत्वाचे रक्षण करण्यासाठी आणि खिलजीपासून (जनानखान्यात अवमानित होऊन खितपत पडण्यापासून) स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्यासाठी महाराणी पद्मिनीच्या नेतृत्वाखाली यज्ञमयी ज्वालेमध्ये १६ सहस्र राजपूत स्त्रियांनी (क्षत्राणींनी) आपल्या जीवनाची आहुती देऊन जोहर केला. त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने किल्ल्यात प्रवेश केला आणि तेथील शासन आपल्या प्रतिनिधीकडे सोपवून तो परत गेला. अल्लाउद्दीनचा प्रतिनिधी खिंजर खानने वर्ष १३१५ मध्ये जालोरच्या मालदेव सोनगराला आपल्या स्वतःच्या पदावर नियुक्त केले आणि तो चित्तौडहून निघून गेला. त्यानंतर मालदेवने चित्तोडवर वर्ष १३२१ पर्यंत शासन केले.

काही साम्यवादी इतिहासकारांनी आपल्या वीरश्रीने भरलेला, गौरवशाली, मातृभूमीसाठी बलीदान करणार्‍या इतिहासाला बुद्धीपुरस्सर विकृतपणे सादर केले. या इतिहासकारांनी आमच्या विरांच्या विजयगाथांना महत्त्व न देता केवळ मोगलांचा इतिहास सादर केला आणि असा (शत्रूचे गुणगान करून भारतियांमध्ये पराभूत मानसिकता निर्माण करणारा) इतिहास भारतभरातील विद्यार्थ्यांना सध्या शिकवला जात आहे. खरे पहाता आमचा गौरवशाली इतिहास निष्पक्षपणे विद्यार्थ्यांना शिकवण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे.’

– अधिवक्ता नवीन कुमार

(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, फेब्रुवारी २०२१)