कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची माहिती नगरविकास विभागास सादर !

कोल्हापूर – कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची माहिती, महानगरपालिका सदस्य संख्या यासंदर्भातील माहिती महानगरपालिका प्रशासनाने राज्याच्या नगरविकास विभागास सादर केली आहे. वर्ष २०१७ पासून शहराची कोणतीही हद्दवाढ झालेली नसली तरी गेल्या अनेक वर्षांपासून शहराची हद्दवाढ व्हावी, अशी मागणी होत असल्याचे नमूद करून १८ गावे, तसेच शिरोली आणि गोकुळ शिरगाव या औद्योगिक वसाहतीसह यापूर्वीही प्रस्ताव पाठवल्याचे महापालिकेने नगरविकास विभागाला पाठवलेल्या अहवालात म्हटले आहे.

राज्यशासनाच्या नगरविकास विभागाकडून राज्यातील सर्वच महानगरपालिका नगरपंचायती, नगर परिषदा यांना परिपत्रक पाठवून वर्ष २०१७ पासून आतापर्यंत शहराची हद्दवाढ झाली असल्यास, तसेच हद्दवाढ होऊनही नंतर त्या शहराचे पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर झाले असल्यास त्याची माहिती आणि वर्ष २०१७ प्रमाणे निर्वाचित सदस्यांची संख्या याविषयीची माहिती मागवली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक वर्ष २०१५ मध्ये झाली असून त्या वेळी सभागृहात ८१ सदस्य संख्या होती, असेही नगरविकास विभागाला कळवण्यात आले आहे.