‘हरित गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा ! – राहुल रोकडे, उपायुक्त, सांगली महापालिका

सांगली – यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी पर्यावरणपूरक आणि ‘इको फ्रेंडली’ साजरा करावा. त्याचसमवेत ‘हरित गणेशोत्सव’ साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले. आगामी गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणेच्या सिद्धतेचा आढावा उपायुक्त राहुल रोकडे यांनी घेतला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी उपायुक्त रोकडे म्हणाले, ‘‘गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाईन पद्धतीने अनुमती प्रक्रिया चालू केली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे नियोजन करण्याचे काम चालू आहे. श्री गणेशमूर्तीदान करणार्‍यांना प्रमाणपत्र दिले जाणार असून नागरिकांनी निर्माल्य हे कुंडात विसर्जन करावे. महापालिका क्षेत्रात फिरत्या विसर्जन कुंडांची संख्या वाढवण्यात येणार असून पर्यावरणपूरक उत्सवासाठी जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार आहे.’’ (धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करणे आवश्यक असते ! याचसमवेत वैयक्तिक धर्माचरण करणे, हे भारतीय घटनेच्या कलम २५ नुसार दिलेला ‘धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार’ आहे. हा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रशासनाने हिंदूंना श्री गणेशमूर्ती पाण्यात विसर्जन करण्यास आडकाठी आणणे योग्य नाही. हिंदूंचे उत्सव हे पर्यावरणपूरकच असतात, त्यामुळे त्या संदर्भात जनजागृती करण्यापेक्षा हिंदूंना धार्मिक आचरण करण्यास मुभा देणे अपेक्षित आहे !  – संपादक)

संपादकीय भूमिका

गणेशोत्सव हा मुख्यत्वेकरून धार्मिक उत्सव असून प्रशासनाने त्या दृष्टीकोनातून विचार करणे अपेक्षित आहे ! हिंदूंच्या सणांच्या वेळी पर्यावरणपूरक आणि ‘इको फ्रेंडली’, तसेच हरित साजरा करावा, असे आवाहन करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे आवाहन का करत नाही ?