भारतात आत्मघातकी आक्रमणाचा कट रचलेल्या इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला रशियात अटक !

भारतातील भाजपच्या वरिष्ठ नेत्याला लक्ष करण्याचा कट उघड !

मॉस्को – रशियातून भारतात घुसखोरी करू पहाणार्‍या एका आतंकवाद्याला रशियाच्या सुरक्षायंत्रणांनी अटक केली. या आतंकवाद्याने भारतातील सत्ताधारी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याला लक्ष करण्याचा कट रचला होता. भाजपच्या संबंधित नेत्याच्या जवळ जाऊन हा आतंकवादी स्वतःला बाँबने उडवून देणार होता.

मध्य आशियातील हा आतंकवादी तुर्कीये येथील इस्तंबूल येथे असतांना सामाजिक माध्यमांद्वारे इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांच्या संपर्कात आला. काही आतंकवाद्यांना तो प्रत्यक्षातही भेटला. त्यानंतर एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत त्याने आतंकवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण घेतले. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी या आतंकवाद्याचा ५७ सेकंदांचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. या प्रकरणी अधिक माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेटच्या वाढत्या कारवायांविषयी भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिस्री यांनी चिंता व्यक्त केली होती. भारतात कारवाया करण्यासाठी भारतात निघालेल्या इस्लामिक स्टेटच्या या आतंकवाद्याला रशियात अटक करण्यात आल्यानंतर भारताची चिंता वाढली आहे.

संपादकीय भूमिका

इस्लामिक स्टेटची पाळेमुळे जगभर पसरली असून ही आतंकवादी संघटना भारताच्या मुळावर उठली आहे, याची अनेक उदाहरणे समोर आली आहे. आता भारत सरकारने केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध आतंकवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !