पाकिस्तानमध्ये हिंदु नागरिकावर ईशनिंदेचा खोटा आरोप करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न !  

हैदराबाद (पाकिस्तान) – कुराणाविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून अशोक कुमार या स्वच्छता कर्मचार्‍याच्या विरोधात ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला. अशोक कुमार यांच्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर मुसलमानांनी त्यांच्या घराबाहेर एकत्र येऊन त्यांच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच वेळी पोलीस घटनास्थळी पोचल्यामुळे कुमार थोडक्यात बचावले. जमावाने पोलिसांकडे ‘अशोक यांना आमच्या कह्यात द्यावे’, अशी मागणी केली. या वेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. सध्या अशोक कुमार यांना हैदराबादच्या सदर येथील राबिया सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. अशोक कुमार यांच्याशी झालेल्या भांडणानंतर एका स्थानिक रहिवाशाने त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. स्थानिक रहिवाशाशी वैयक्तिक भांडणामुळे अशोक कुमार यांना लक्ष्य करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये ईशनिंदा कायदा कठोर आहे. या अंतर्गत फाशीची शिक्षा करण्यात येते. ईशनिंदेच्या आरोपावरून अनेकांना ठार मारण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ मध्ये, एका कारखान्यातील श्रीलंकेचा नागरिक असणार्‍या व्यवस्थापकाला ईशनिंदेच्या आरोपावरून पाकिस्तानी जमावाने मारहाण करून जाळून टाकले होते.

संपादकीय भूमिका

भारतात प्रतिदिन हिंदूंच्या देवतांचा अवमान होत असतांना आरोपींना कठोर शिक्षा करणारा कोणताही कायदा नाही !