पुणे – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांचा वापर करून देशात विविध माध्यमांतून हिंदुविरोधी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केला. शीख माणसाला विनोदी शैलीने आणि हिंदु पंडितांना ढोंगी दाखवण्यात आले. भारतीय संस्कृती विरोधी विचार आतापर्यंत देशातील ३ पिढ्यांपासून मनात रुजवण्याचा प्रयत्न सोयीस्करपणे करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळाले; परंतु लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेले ‘स्वराज्य’मधील ‘राज्य’ आपल्याला मिळाले; पण ‘स्व’च्या स्वातंत्र्याचा संघर्ष अद्यापही चालूच आहे, असे मत भाजपचे खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी व्यक्त केले. ते ‘विश्व संवाद केंद्र’ (पश्चिम महाराष्ट्र) आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘देवर्षी नारद पत्रकारिता’ पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
ब्रिटिश सरकारचे सचिव हे ज्या पक्षाचे संस्थापक आहेत, ते जाणीवपूर्वक भारतीय नागरिकांना हिंदुत्वापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका काँग्रेस पक्षाचे नाव न घेता त्रिवेदी यांनी केली. ते पुढे म्हणाले, ‘‘भारत म्हणून आम्हाला जगावर वर्चस्व करायचे नाही, तर आम्हाला जगाला प्रेरित करायचे आहे. त्यामुळे भारत जगात महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न नाही, तर जगात ‘विश्वगुरु’ व्हायचे असून त्या दिशेने वाटचाल करत आहोत.’’