नागपूर येथे रुग्णाच्या मृत्यूमुळे नातेवाइकांकडून किमया रुग्णालयात तोडफोड !

कर्मचार्‍यांना धक्काबुक्की !

नागपूर – शहरातील किमया रुग्णालयात उपचारांच्या वेळी एका रुग्णाचा मृत्यू झाला. ‘आधुनिक वैद्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे’, असा आरोप करत रुग्णाच्या नातेवाइकांनी १९ ऑगस्ट या दिवशी रुग्णालयात तोडफोड केली.

याविषयी रुग्णालयातील एका कर्मचार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, रुग्णावर योग्य उपचार झाले होते. त्यामुळे आम्ही तोडफोड करणार्‍यांच्या विरोधात तक्रार करणार आहोत. १५ दिवसांपूर्वी रुग्णाला किमया रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्ण ‘डायलिसिस’वर होता; मात्र १९ ऑगस्टच्या सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शाहरूख नावाच्या व्यक्तीसह इतर काही लोकांनी रुग्णालयात तोडफोड करत कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी भारत क्षीरसागर यांनी ‘रुग्णालयाचे व्यवस्थापक तक्रार करण्यासाठी आले आहेत’, असे सांगितले.