राज्यात दहीहंडी उत्साहात साजरी !

  • दहीहंडी फोडतांना १२ गोविंदा घायाळ

  • सरकार गोविंदांना खेळाडूंचा दर्जा देऊन सोयी-सुविधा देणार

मुंबई – गेल्या २ वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे घातलेले निर्बंध नुकतेच हटवण्यात आले असल्याने राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली. दहीहंडी फोडतांना मुंबईत विविध ठिकाणी १२ गोविंदा घायाळ झाले आहेत. त्यांपैकी ५ जणांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे, तर ७ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

आम्ही दीड मासापूर्वीच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ‘हंडी फोडली’ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ठाण्यातील टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीड मासांपूर्वी शिवसेनेच्या ४० आमदारांच्या गटाला समवेत घेऊन भाजपसह सत्ता स्थापन केल्याचा उल्लेख ‘हंडी फोडली’, अशा शब्दांत केला. ते म्हणाले, ‘‘गेल्या दीड ते २ मासांत पुष्कळ घडामोडी घडल्या. त्याच काळात आम्ही सर्वांत मोठी ‘हंडी फोडली’. ती कठीण होती; पण बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ती फोडली. त्या हंडीसाठी ‘५० थर’ लावले होते. येत्या काळात या थरांमध्ये आणखी वाढ होईल.’’

सर्व सुविधांमुळे गोविंदांना आता मोकळे वाटत आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘गोविंदा आता खेळाडू झालेले आहेत. खेळाडूंना दिल्या जाणार्‍या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. सर्व सुविधांमुळे गोविंदांना आता मोकळे वाटत आहे.’’