१. राधेने केलेले आत्मनिवेदन आणि राधेच्या आत्मनिवेदनावर श्रीकृष्णाने तिला केलेले मार्गदर्शन
१ अ. राधेने श्रीकृष्णाला केलेले प्रार्थनारूपी आत्मनिवेदन : ‘राधा नदीकिनारी पाणी भरण्यासाठी गेली. कृष्णाच्या आठवणीने व्याकुळ होऊन तिच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. नदीचा जलाशय तिला समुद्राप्रमाणे विराट स्वरूप धारण केलेला दिसत होता. समुद्राच्या दुसर्या किनार्यावर, दूरवर तिला पिवळसर रंगाची तेजस्वी; परंतु अस्पष्ट आकृती दिसत होती. तो श्रीकृष्ण होता. त्या आकृतीला पहाताच राधेच्या चेहर्यावर हास्य उमटले आणि ती आनंदाने उठून उभी राहिली. इतक्यात तिला दिसणारी आकृती लोप पावली. पुन्हा उदास होऊन ती खाली बसली. तेव्हा तिला पाण्यात श्रीकृष्णतत्त्व दिसू लागले. ते पाणी निळसर होते आणि ती त्याला आर्ततेने विनवू लागली. ‘हे श्रीकृष्णा, हे भगवंता, तूच मला या प्रसंगातून आणि मृगजळातून सोडव. एकीकडे तुझ्यावरील प्रेमामुळे माझे मन तुझ्या सगुण रूपाकडे आकृष्ट होते, तर दुसरीकडे माझी ईश्वरप्राप्तीची तळमळ अल्प पडते. (‘प.पू. डॉक्टर, माझीही हीच स्थिती आहे. देवाच्या भेटीसाठी मन व्याकुळ होते; पण साधनेचे प्रयत्न तळमळीने होत नाहीत.’ – कु. कौमुदी) तूच माझे तुझ्यावरील प्रेम न्यून कर आणि तुझ्या सगुण रूपाकडे येण्याची ओढ अल्प कर. ‘हे भगवंता, तूच माझ्या मनात ईश्वरप्राप्तीचे विचार वाढव आणि तुझ्या निर्गुण रूपाकडे येण्याची ओढ वाढव’, अशी प्रार्थना राधेने केली.
१ आ. राधेच्या आत्मनिवेदनावर श्रीकृष्णाने तिला केलेले मार्गदर्शन : श्रीकृष्ण म्हणाला, ‘सामान्य जनांसाठी २ मार्ग आहेत. एक आहे प्रेमाचा आणि दुसरा ईश्वरभक्तीचा. तू भक्तीच्या अंतर्गत प्रेमयोगाने साधना करत असल्याने या योगाचा शेवट ईश्वरप्राप्ती आहे. तू जेथे उभी आहेस, तेथे २ मार्ग नसून एकच मार्ग आहे. या मार्गाची खालची बाजू (अधोगतीची बाजू), म्हणजे माझ्यावरील प्रेम आहे आणि वरील बाजू ईश्वरप्राप्ती आहे. तुझ्यापासून दूर जाऊन मी तुझा अधोगतीचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे तुझ्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे, या मार्गाने उत्तरोत्तर चालत रहाणे. असे झाले, तर ‘मी प्रत्येक क्षणी तुझ्याजवळ आहे’, याची तुला अनुभूती येईल. तू मधुराभक्ती करत माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहेस. तू यांतील ‘मधुरा’, म्हणजे प्रेम या शब्दात अडकलीस आणि त्याच्या पुढील ‘भक्ती’ या शब्दाला विसरून गेलीस. माझ्याकडे प्रियकर म्हणून न पहाता तुला ‘आध्यात्मिक मार्गदर्शन करून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने नेणारा गुरु आहे’, याची जाणीव ठेव. जेव्हा तू माझी प्रियकर म्हणून आठवण काढशील, तेव्हा मी तुला दर्शन देणार नाही. जेव्हा ईश्वरप्राप्तीच्या तळमळीने तू व्याकुळ होशील, तेव्हा मी तुझा गुरु बनून तुला दर्शन देईन.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘रासलीला’)
२. राधेचे आत्मनिवेदन आणि त्यावर श्रीकृष्णाने केलेले मार्गदर्शन वाचतांना साधिकेला सुचलेली सूत्रे
२ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगून ‘ईश्वरप्राप्ती’ हेच ध्येय दिल्याने साधक त्यांच्यात न अडकणे : आत्मनिवेदन आणि मार्गदर्शन याचे वाचन केल्यावर मला जाणवले, ‘या जन्मात साक्षात् भगवंत गुरुरूपात अवतरित झाला आहे. त्याला साधक आणि गोपी यांना ईश्वरप्राप्तीकडे न्यायचे आहे.’
‘परात्पर गुरु डॉक्टर, याच कारणासाठी तुम्ही ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आणि साधकांना स्वतःमध्ये अडकू दिले नाहीत. श्रीकृष्णाने दूर जाऊन राधेचा खालचा मार्ग (अधोगतीचा मार्ग) बंद केला; पण तुम्ही आम्हाला ‘ईश्वरप्राप्ती’ याच ध्येयाने प्रेरित करून वरचाच मार्ग दाखवला आहे. साधक ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने जातात; म्हणून त्यांना भगवंत, म्हणजे तुम्ही सतत त्यांच्या समवेत असल्याची अनुभूती येते.
साक्षात् भगवंताने गुरुरूपात अवतार घेतला आणि आम्हाला जवळ केले. ‘देवा ही तुझीच कृपा आहे. हे विचार तुझेच असून तुझ्या चरणकमली समर्पित करते.’
– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |