संत ज्ञानेश्वर यांनी रेड्याकरवी वदवलेल्या वेदांचा प्रसंग

आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

संत ज्ञानेश्वर

श्रीक्षेत्र आळंदीच्या धर्ममार्तंडांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्मसभेचे शुद्धीपत्र मागितले. त्यामुळे ही भावंडे पैठण येथे गेली. पैठण येथील धर्मसभेमध्ये त्यांना अनेक सत्त्वपरीक्षांना सामोरे जावे लागले. त्या वेळी समोरून ‘वाकोबा’ नावाचा कोळी आपल्या ‘गेनोबा’ नावाच्या रेड्यास घेऊन जात असतांना धर्मसभेतील एका धर्मपंडिताने ज्ञानदेवांना विचारले, ‘‘त्या रेड्याचा आणि तुझा आत्मा एकच आहे का ?’’ तेव्हा ज्ञानदेव म्हणाले, ‘‘तोची माझा आत्मा ॥’’ ‘हे सिद्ध करून दाखव’, असे सांगितल्यावरून संत ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेऊन वेद उच्चारण्याची त्यास आज्ञा केली. त्या वेळी रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाचे पुढील ध्वनी बाहेर पडले, ‘ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होेतारं रत्नधातमम् ॥’ (ही ऋग्वेदाची पहिली ओळ आहे.)

माउलीं​नी रेड्यामुखी वदविले वेद

तेव्हापासून तो रेडा हा संत ज्ञानेश्वर यांचा पहिला शिष्य झाला. या चमत्काराने प्रभावित होऊन धर्मसभेने संत ज्ञानेश्वर यांना शुद्धीपत्र बहाल केले.

(संदर्भ : ‘सनातन संस्थे’चे संकेतस्थळ)