पुरी येथे १८ ऑगस्टला, तर मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे १९ ऑगस्टला श्रीकृष्णजन्माष्टमी साजरी होणार !

मथुरा (उत्तरप्रदेश) – यावर्षी १८ आणि १९ ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजन्माष्टी असल्याचे पंचांगांमध्ये म्हटले आहे. काही पंचांगांमध्ये १८ ऑगस्ट आणि काहींमध्ये १९ ऑगस्ट या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रावर झाला असून हे दोन्ही योग १९ ऑगस्टला रहाणार असल्याने याच दिवशी मथुरा, वृंदावन आणि द्वारका येथे जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे; मात्र पुरी येथे जगन्नाथ मंदिराच्या पंचांगानुसार १८ ऑगस्टला रात्री अष्टमी तिथी प्रारंभ होत असल्यामुळे त्याच वेळेला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे.

अखिल भारतीय विद्वत परिषद आणि काशी विद्वत परिषद यांचे म्हणणे आहे की, १८ ऑगस्टला अष्टमी तिथी सूर्योदयाच्या वेळी नाही, तर रात्री असणार आहे. त्याच वेळी १९ ऑगस्टला सूर्योदयाला अष्टमी तिथी चालू होऊन रात्रीही राहील. त्यामुळे जनामाष्टमी केवळ १९ ऑगस्टला साजरी करणे चांगले राहील. श्रीकृष्णाचे जन्म नक्षत्र रोहिणीही याच रात्री राहील. उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये जन्माष्टमी १९ ऑगस्टलाच साजरी केली जाईल.