सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांना साधनेच्या आरंभीच्या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पदोपदी सूक्ष्मातून साहाय्य करण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सनातनच्या ११२ व्या समष्टी संत पू. दीपाली मतकर यांचा श्रावण कृष्ण द्वितीया (१३ ऑगस्ट २०२२) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘साधनेविषयी मार्गदर्शन करणार्‍या’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या ध्वनीचकत्या ऐकल्यानंतर त्यांचा आवाज ओळखीचा आहे’, असे वाटणे

‘डोंबिवली येथील आमच्या घराजवळ रहाणारे श्री. प्रकाश शिंदे आम्हाला गुरुदेवांविषयी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी) सांगायचे. ते आम्हाला ‘गुरुदेव कसे शिकवतात ?’, हे सांगायचे. ते ऐकून मला वाटायचं, ‘मलाही त्यांना भेटायला मिळावे. त्यांची वाणी ऐकायला मिळावी.’ तेव्हा माझे वय १३ वर्षे होते. श्री. शिंदेकाकांनी मला गुरुदेवांच्या साधनेविषयी मार्गदर्शन करणार्‍या काही ध्वनीचकत्या आणून दिल्या. त्या ऐकल्यानंतर मला वाटले, ‘मी आधीपासूनच गुरुदेवांना ओळखते. त्यांचा आवाज माझ्या ओळखीचा आहे.’

२. रात्री वडील सेवेसाठी गेले असतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, असे जाणवणे

रात्रीच्या वेळी घरी मी, माझा लहान भाऊ नीलेश (वय ९ वर्षे) आणि रुग्णाईत आजी असे रहायचो. वडील प्रतिदिन रात्री दैनिक ‘सनातन प्रभात’चे मुद्रण होत असलेल्या छापखान्यात सेवेसाठी जायचे. त्या वेळी आमचे शेजारी म्हणायचे, ‘बाबा तुम्हाला सोडून सेवेला कसे जातात ? तुम्ही वयाने लहान आहात.’ त्या वेळी मला जाणवायचे, ‘गुरुदेव आमच्या समवेत आहेत.’

 

पू. (कु.) दीपाली मतकर

३. घरी असतांना ‘काही दिवसांसाठी मी तुला घरी ठेवले आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून सांगत असल्याचे जाणवणे आणि ‘घरातील सेवा पूर्ण करून लवकर त्यांच्याकडे जायचे आहे’, असे वाटणे

‘माझा भाऊ लहान होता. आजी अंथरुणावर (रुग्णाईत) होती. त्या वेळी गुरुदेव समवेत आहेत आणि ते मला शिकवत आहेत. ‘काही दिवसांसाठी या सेवेत मी तुला ठेवले आहे’, असे ते मला सांगत असल्याचे जाणवायचे. तेव्हा ‘इथली (घरातील) सेवा लवकर पूर्ण करून गुरुदेवांकडे जायचे आहे’, असे मला वाटायचे. तसे मी गुरुदेवांशी सतत मानस बोलत असायचे.

४. आईच्या निधनानंतर घरातील सर्व कामे करतांना ‘स्वतःच्या संदर्भात असे का झाले ?’, याचे दुःख होणे आणि त्याच कालावधीत परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘माया तुला सोडून गेली’, असे सांगितल्यावर दुःखात अडकण्यापेक्षा गुरुदेवांना आवडेल तसे करू लागणे

‘वर्ष २००३ मध्ये आई वारल्यानंतर सूक्ष्मातून देवाने मला सांगितले, ‘तुलाच आता आई व्हायचे आहे.’ भाऊ लहान असल्यामुळे त्याला स्वतःचे काही करण्याचे लक्षात यायचे नाही. ‘आता त्याची आई आपणच आहोत’, हे लक्षात घेऊन त्याचेही सर्व मीच करायचे. त्याला शाळेत सोडायचे, वडिलांचा डबा करायचा, रुग्णाईत आजीची सेवा करायची, माझे सर्व आवरून शाळेत जायचे, इत्यादी सर्व करायचे. गुरुदेवच ते सर्व करून घेत होते. आरंभी हे सर्व जमायचे नाही. त्या वेळी मी देवाशी भांडायचे. त्या वेळी मनात दुःखही होते, ‘माझ्या संदर्भातच हे असे का झाले ?’ त्याच कालावधीत माझी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी भेट झाली. त्यांनी एकच वाक्य सांगितले, ‘‘माया तुला सोडून गेली आहे. किती छान झाले !’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘मायेने मला सोडले आहे, तर मी कशाला दुःखात अडकते ? त्यापेक्षा गुरुदेवांना आवडेल, असे करावे.’ गुरुदेवही ते सहजतेने करून घेत होते. तेच मला सांभाळत होते.’

५. लहानपणापासूनच ‘आपला संसार भगवंताशीच असावा’, असे वाटत असल्याने वडिलांनी आणलेल्या स्थळांना टाळण्यासाठी गुरुदेवांचा धावा करणे

‘लहानपणापासून माझ्या मनात विवाह करण्याचे विचार आले नाहीत. लहान असतांना असे वाटायचे, ‘आपला संसार भगवंताशीच असावा. मला देवाचा संसार करता यावा.’ साधनेत आल्यावर समष्टी सेवा (समाजामध्ये अध्यात्मप्रसार करण्याचे कार्य) आणि समष्टी संसार (सहसाधकांची साधना व्हावी, या दृष्टीकोनातून त्यांना सांभाळणे) करण्याचे महत्त्व लक्षात आल्याने मनात विवाहाचे विचार आले नाहीत. बाबा आमच्या घरी मुलांना मला बघण्यासाठी बोलवायचे. तेव्हा ते नको वाटायचे. ‘हे काय चालू आहे ? मला यात अडकायचे नाही’, असे वाटायचे. त्या वेळी गुरुदेवांचा खूप धावा व्हायचा, ‘यात मला अडकायचे नाही. मला तुमच्याकडेच यायचं आहे’, असे मी गुरुदेवांना सांगायचे.

६. पुराचे पाणी घरात शिरून ते वाढल्याने दोन दिवस काही न खाता माळ्यावर बसावे लागणे, भूक लागल्याने लहान भाऊ रडू लागल्यावर गुरुदेवांना शरण जाऊन परिस्थिती सांगितल्यावर पाणी ओसरणे आणि त्यांच्या कृपेने डब्यांतील धान्य अन् अन्य साहित्य न भिजणे

‘वर्ष २००५ मध्ये मुंबईमध्ये पावसामुळे पूर येऊन आमच्या घरात पाणी आले होते. माझे वडील पावसात अडकले होते. आम्ही बालदीने घरात आलेले पाणी काढत होतो; पण पाणी संपतच नव्हते. नंतर पाणी खूप वाढल्याने आम्ही माळ्यावर चढून बसलो. २ दिवस आम्ही माळ्यावरच होतो. आम्ही काहीच खाल्लेले नव्हते. वडीलही घरी आले नव्हते. मी सतत गुरुदेवांचा धावा करत होते. तेव्हा गुरुदेव सूक्ष्मातून आले आणि मला म्हणाले, ‘झालं. हे संपत आलं.’ भाऊ लहान असल्याने त्याला ‘पूर आला आहे. त्यामुळे आपल्याला खायला मिळणार नाही’, असे कळत नव्हते. तो रडून त्याला भूक लागल्याचे सांगत होता. त्या वेळी मी गुरुदेवांना मानस सांगितले, ‘मी काय करू ? हा (भाऊ) रडत आहे. ‘मी काय करू ?’, हे तुम्हीच सांगा. हा लहान आहे.’ नंतर मी गुरुदेवांचा पुष्कळ धावा केला आणि त्यांना शरण गेले. त्यानंतर पाणी ओसरले. घरातील सर्व साहित्य भिजले होते. ‘डब्यांतील धान्य वगैरे भिजले असेल’, असे मला वाटत होते; परंतु नंतर पाहिले, तर डब्यांतील धान्य आणि साहित्य जसं आहे, तसेच होते. ते भिजलेले नव्हते. इतरांच्या घरांतील डबेच्या डबे पाण्याने वाहून गेले होते. गुरुदेवांनीच आम्हाला वाचवले.

७. रामनाथी आश्रमात आल्यानंतर ‘आश्रम हेच घर आहे’, असे वाटणे आणि गुरुदेवांनी ‘तुझ्यासाठी आश्रमाची दारे उघडी असल्याचे’ सांगणे

‘एकदा डोंबिवली येथील काही साधकांच्या समवेत मी सनातन संस्थेचा रामनाथी, गोवा येथील आश्रम पहायला आले होते. आश्रमात आल्यानंतर मला वाटले, ‘रामनाथी आश्रम हेच माझे घर आहे. आता येथून मला परत घरी जायचे नाही.’ गुरुदेवांचा सत्संग लाभल्यावर मी त्यांना हे सांगितले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘मी तुझ्यासाठी आश्रमाची दारे उघडी ठेवली आहेत.’’

८. ‘माता यशोदेला एकाच कृष्णाला भरवायला मिळाले; परंतु आश्रमात स्वतःला अनेक कृष्णांना भरवायला मिळते’, याचा पुष्कळ आनंद होणे

आश्रमातील भोजनकक्षात साधक जेवायला यायचे. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती व्हायची आणि वाटायचे, ‘प्रत्येकाच्या मुखातून माझा कृष्ण जेवत आहे.’ त्याचा मला पुष्कळ आनंद व्हायचा. ‘माता यशोदेला एकाच कृष्णाला भरवायला मिळाले; पण मला एवढ्या सगळ्या कृष्णांना भरवता येत आहे’, याचा पुष्कळ आनंद वाटायचा.’

– कु. दीपाली मतकर (आताच्या पू. दीपाली मतकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था) (मे २०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक