नवी मुंबईत चर्चच्या आश्रमशाळेतील ३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार; शाळाचालकाला अटक

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – सीवूड्स येथे अनधिकृतरित्या चालवण्यात येत असलेल्या ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्चमधील आश्रमशाळेवर ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने छापा टाकून ४५ अल्पवयीन मुलांची सुटका केली. यातील १३ मुलींपैकी ३ मुलींचे क्रूरपणे शोषण झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी चर्चमधील आश्रमशाळा चालवणारा राजकुमार येशुदासन याला अटक करण्यात आली आहे.

महिला आणि बाल विकास अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी सांगितले की, ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या चर्चमध्ये लहान मुले, मतीमंद महिला असून तेथे अपप्रकार चालू असल्याची माहिती ठाणे महिला बाल विकास विभागाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने चर्चवर छापा टाकून मुलांची सुटका केली. या सर्वांना उल्हासनगरमधील शासकीय बालगृहात ठेवण्यात आले आहे.

सुटका करण्यात आलेल्या १२ ते १५ वर्षे वयोगटातील ३ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. चर्चमधील पास्टरकडून मुलींवर क्रूरतेने लैंगिक अत्याचार केले जात होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत असून पोलिसांकडून अधिक अन्वेषण चालू आहे.

मुलीच्या अंगाला व्हिक्स आणि तेल लावणे, त्यांना गुंगीची गोळी देऊन झोपवून ठेवणे, असे प्रकार केले जात असल्याचे मुलींनी सांगितले आहे. यातील एका मुलीचा गर्भपातही केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या शाळेतील मुलींना त्यांच्या पालकांना भेटून दिले जात नव्हते. असे प्रकार महिला बाल विकास विभागाच्या चौकशीत उघड झाले आहेत.

या प्रकरणी ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकार्‍यांनी एन्.आर्.आय. पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

या घटनेमुळे चर्चविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

संपादकीय भूमिका 

ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये चालणार्‍या अपप्रकारांविषयी पुरो(अधो)गामी शब्दही उच्चारत नाहीत, हे लक्षात घ्या !