वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी वावरतांना तेथे कार्यरत असलेल्या स्पंदनांचा व्यक्तीवर (तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर) होणारा परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘भारतात प्राचीन काळापासून वास्तूशास्त्र प्रचलित आहे. वास्तूतील स्पंदनांचा व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घर बांधल्यास मानवाला चांगले आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती प्रचलित होती. एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ अन् जाणकार मंडळी नेहमी सांगत असत, ‘आढ्याखाली बसू नये, तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून स्तोत्रे म्हणावीत, रात्री लवकर झोपावे, पूर्व पश्चिम निजावे इत्यादी.’ यामागे वास्तूशास्त्र दडले आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने वास्तूशास्त्राच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे. यांपैकी एक संशोधन पुढे दिले आहे. 

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी वावरतांना मनाला निरनिराळ्या संवेदना जाणवणे

सौ. मधुरा कर्वे

सर्वसाधारणपणे आपण ज्या ठिकाणी वावरतो, त्याचा सूक्ष्म परिणाम आपल्यावर नकळतपणे होत असतो. घरात विविध खोल्या असतात, उदा. बैठककक्ष, स्वयंपाकघर, झोपण्याची खोली इत्यादी. प्रत्येक खोलीत गेल्यावर तेथे निराळी स्पंदने कार्यरत असतात. बैठकीच्या खोलीत बसलो की, एखाद्या विषयावर चर्चा करावी वाटते. स्वयंपाकघरात गेल्यावर मनात खाण्याचे विचार घोळू लागतात. झोपायच्या खोलीत गेल्यावर विश्रांती घ्यावीशी वाटते. खिडकीपाशी बसल्यावर मनाला उत्साह जाणवतो, तर खिडकीतून बाहेर मोकळ्या आकाशाकडे पाहिले की, मनाला आनंद जाणवतो. अशा प्रकारे वास्तूत वेगवेगळ्या ठिकाणी वावरतांना मनाला निरनिराळ्या संवेदना जाणवतात.

‘वास्तूत विविध ठिकाणी बसल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म-ऊर्जेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक प्रयोग करण्यात आला. या प्रयोगात सर्वसाधारण व्यक्तीला विविध ठिकाणी बसवून तिची छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांची ‘यू.ए.एस्. (युनिर्व्हसल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

टीप – या प्रयोगात ‘पंख्याखाली बसल्याने व्यक्तीवर काय परिणाम होतो ?’, हेही अभ्यासण्यात आले.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. ‘व्यक्तीने भिंतीजवळ बसणे’, या छायाचित्रात सकारात्मक ऊर्जा काहीच नसून सर्वाधिक प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळून आली.

१ अ. विश्लेषण – ‘व्यक्तीने भिंतीजवळ बसणे’ या छायाचित्रातून सर्वाधिक नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : भिंतीमध्ये जडत्व असल्याने तेथे बसल्यावर व्यक्तीच्या मनाला जडत्व जाणवते. यामुळे तिच्यावर त्रासदायक स्पंदनांचे आवरण येते किंवा त्यामध्ये वाढ होते.

२. ‘पंखा चालू असतांना’च्या छायाचित्राच्या तुलनेत ‘पंखा चालू नसतांना’च्या छायाचित्रामध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प आहे. ‘पंखा चालू असतांना’च्या छायाचित्रामध्ये सकारात्मक ऊर्जा काहीच नव्हती; पण ‘पंखा चालू नसतांना’च्या छायाचित्रामध्ये काही प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

२ अ. विश्लेषण – ‘पंखा चालू नसतांना’च्या तुलनेत ‘पंखा चालू असतांना’च्या छायाचित्रातून अधिक नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : विजेवर चालणार्‍या उपकरणातून निर्माण होणार्‍या त्रासदायक नादामुळे तेथील वायुमंडल दूषित होते. याचा नकारात्मक परिणाम तेथे वावरणार्‍यावर होतो.

३. वरील तिन्ही छायाचित्रांच्या तुलनेत ‘व्यक्तीने छताखाली बसणे’, या छायाचित्रामध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण अल्प आहे.

३ अ. विश्लेषण – वास्तूच्या छताकडील भागातून (उर्ध्व दिशेकडून) वास्तूमध्ये सकारात्मक स्पंदने येतात. खोलीत छताखाली बसल्याने व्यक्तीला या सकारात्मक स्पंदनांचा लाभ झाला. यामुळे तिच्याभोवतीचे नकारात्मक स्पंदनांचे आवरण अल्प झाले.

४. वरील चारही छायाचित्रांच्या तुलनेत ‘व्यक्तीने खिडकीजवळ बसणे’, या छायाचित्रामध्ये नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण सर्वांत अल्प आहे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक आहे.

४ अ. विश्लेषण – चैतन्य प्रदान करणे, हे तेजतत्त्वाचे कार्य आहे. सूर्याकडून प्रक्षेपित होणार्‍या तेजामुळे वातावरण शुद्ध आणि चैतन्यमय बनते. खिडकीजवळ बसल्याने व्यक्तीला चैतन्य मिळाल्याने तिच्याभोवतीचे त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ अल्प झाले आणि तिच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ झाली.

थोडक्यात, वास्तूत कार्यरत असलेल्या स्पंदनांचा परिणाम व्यक्तीतील सूक्ष्म-ऊर्जेवर होतो. यामुळे वास्तूत विविध ठिकाणी वावरतांना तिच्या मनाला निरनिराळ्या संवेदना जाणवतात.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.२.२०२२)

ई-मेल : [email protected]

खोलीच्या चारही ठिकाणी बसले, तर नकारात्मक स्पंदने अधिक आहेत. मग खोलीत कुठेही बसू नये का ? 

उत्तर : ‘खोलीत त्या त्या ठिकाणी बसल्याने व्यक्तीवर काय परिणाम होतो ?’, हे या चाचणीतून लक्षात आले. यातून व्यक्तीने खोलीत कोणत्याही ठिकाणी बसतांना तिने स्वतःवर होणारा परिणाम लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी त्या त्या वेळी घ्यावी. जेव्हा व्यक्ती निराश किंवा दुःखीकष्टी असेल, तेव्हा तिने भिंतीकडे बसणे प्रयत्नपूर्वक टाळावे. त्याऐवजी खिडकीपाशी बसावे, बाहेरील आकाशाकडे पहावे, ईश्वराने बनवलेली सुंदर सृष्टी न्याहाळावी. यामुळे तिला चैतन्य मिळून तिच्याभोवतीचे त्रासदायक (काळे) आवरण अल्प होईल. तिचे मन हलके होईल.

घरात विजेची उपकरणे आवश्यक तेवढीच असावीत, तसेच त्यांचा वापर आवश्यक तेव्हाच आणि योग्य तितकाच करावा. विजेची उपकरणे वापरल्याने होणारा नकारात्मक परिणाम अल्प व्हावा, यासाठी खोलीत देवतेचा नामजप किंवा संतांची भजने लावून ठेवावीत. त्यामुळे खोलीतील वातावरणातील त्रासदायक स्पंदने अल्प होतील, तसेच खोलीची आणि स्वतःची नियमित शुद्धी करावी.

थोडक्यात सध्याच्या विज्ञानयुगात भौतिक सुखसोयी पुष्कळ आहेत; पण त्यामुळे मानव निसर्गापासून म्हणजेच ईश्वरापासून दूर जात आहे, हे लक्षात घ्यावे. असे होऊ नये, म्हणून प्रत्येक गोष्टीचा वापर आवश्यक तेवढाच आणि विचार करून करावा, तसेच जोडीला प्रतिदिन साधना करावी. जसजशी व्यक्तीची साधना वाढेल, तसतशी ती सत्त्वप्रधान बनेल आणि तिच्यातील सात्त्विकतेचा सकारात्मक परिणाम ती रहात असलेल्या वास्तूवर होऊन वास्तूही सात्त्विक बनेल.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.२.२०२२)