रामनाथी (गोवा), १३ ऑगस्ट (वार्ता.) – भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या म्हणजे ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवण्यात येत आहे. शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत सनातनच्या संस्थेच्या गोव्यातील आश्रमात ध्वजारोहण, तर देवद, पनवेल येथील आश्रमात ध्वजवंदन करण्यात आले.
देवद येथील सनातनच्या आश्रमात ध्वजवंदन
देवद येथील सनातनचे साधक श्री. निनाद गाडगीळ यांनी आश्रमातील अन्य साधकांसह ध्वजवंदन केले. या वेळी ध्वजाला वंदन करून राष्ट्रगीत गाण्यात आले, तसेच ‘भारतमाता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ या घोषणा देण्यात आल्या.
रामनाथी (गोवा) येथे सनातन संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या हस्ते ध्वजारोहण
गोव्यातील सनातनच्या आश्रमात १३ ऑगस्ट या दिवशी सकाळी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी संस्थेचे विश्वस्त श्री. नितीन सहकारी यांच्यासह साधक उपस्थित होते. ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले, तसेच घोषणा देण्यात आल्या.
‘हर घर तिरंगा’ या अभियानाला नागरिकांनी पाठिंबा द्यावा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था
१३ ऑगस्ट या दिवशी सनातनचे ठिकठिकाणचे आश्रम, तसेच सेवाकेंद्रे येथे ध्वजारोहण करण्यात आले. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी यासंदर्भात माहिती दिली, तसेच त्यांनी शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला पाठिंबा देण्याचे आवाहनही नागरिकांना केले.