सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणींना शय्यासोबत करावी लागते  !  

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांचा भरती परीक्षा घोटाळ्यावरून आरोप  

काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे

बेंगळुरू (कर्नाटक) – सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांना लाच द्यावी लागते, तर तरुणींना शय्यासोबत करावी लागते, असे विधान येथील काँग्रेसचे नेते प्रियांक खरगे यांनी केले. प्रियांक खरगे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आहेत. ‘कर्नाटक पावर ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड’मधील भरती घोटाळ्याच्या प्रकरणी ते बोलत होते.

‘कर्नाटक पावर ट्रान्समिशन कॉरपोरेशन लिमिटेड’मध्ये एकूण १ सहस्र ४९२ पदांसाठी भरती परीक्षा घेण्यात आली. गोकक येथे परीक्षेच्या वेळी एक विद्यार्थी कॉपी करत असल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर या परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यावरून खरगे यांनी राज्यातील भाजप सरकारवर टीका केली, तसेच या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि एक विशेष पथक स्थापन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.