कोल्हापूर, १२ ऑगस्ट (वार्ता.) – गगनगिरी गड हे हिंदु समाजाचे धार्मिक स्थळ आहे. या गडावर चैतन्य महाराज यांचा मठ आहे. त्यामुळे या गडाचे पावित्र्य राखणे अपेक्षित आहे. मठाच्या पश्चिमेस एक दर्गा असून तेथे धर्मांध आणि समाजकंटक यांच्याकडून मांसाहार आणि मद्यपान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याचसमवेत दर्ग्याच्या जवळ बांधकाम वाढत आहे. दर्ग्याकडे जाणारा रस्ता हा मठामधूनच जातो. या सर्व गोष्टींमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर बांधकामास अनुमती देण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना देण्यात आले. (बहुतांश गडांवर अवैध बांधकाम, मांसाहार आणि मद्यपान होत असल्याचे गडप्रेमी, राष्ट्रप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना दिसते. हीच गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असलेला पुरातत्व विभाग, प्रशासन यांना का दिसत नाही ? – संपादक)
या प्रसंगी हिंदू एकता आंदोलन सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रम पावसकर, पतित पावनचे श्री. महेश उरसाल आणि श्री. सुनील पाटील, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री अधिवक्ता सुधीर जोशी-वंदूरकर, बजरंग दलाचे उपाध्यक्ष श्री. अनिल कोडोलीकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापुरे, भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. सचिन तोडकर, हिंदू एकताचे श्री. हिंदुराव शेळके यांसह अन्य उपस्थित होते.