१२ ऑगस्ट २०२२ या दिवशीच्या ‘विश्व संस्कृतदिना’च्या निमित्ताने ..
१२.८.२०२२ (श्रावण पौर्णिमा) या दिवशी ‘विश्व संस्कृतदिन’ आहे. त्या निमित्त ‘संस्कृत भाषेचे महत्त्व, संस्कृत भाषा मागे पडण्याची कारणे आणि आजच्या वैज्ञानिक युगात संस्कृत भाषा प्रचलित होण्याची आवश्यकता’, या विषयांचा ऊहापोह खालील लेखात केला आहे.
१. भारताप्रती विदेशी लोकांचे आकर्षण असण्याची कारणे
१ अ. भारतियांची जीवनपद्धत आणि भौतिक वैभव यांमुळे विदेशी लोक भारताकडे आकर्षित होणे अन् भारतातील विविध शास्त्रे शिकून त्यांनी आपापल्या देशांमध्ये त्यांचा विकास करणे : ‘संस्कृत ही भारताची सांस्कृतिक भाषा आहे. आपली भारतीय जीवनपद्धत आणि भौतिक वैभव या दोन गोष्टींनी प्रभावित होऊन दोन श्रेणींचे विदेशी लोक भारतात आले. त्यातील प्रथम वर्ग, म्हणजे भारतातील तक्षशिला आणि नालंदा या विश्वविद्यालयांमध्ये अध्ययनासाठी चीन, मिस्र इत्यादी देशांतील विद्यार्थी आले. त्यांनी ज्योतिष, रसायन, चिकित्सा, वास्तूशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचे अध्ययन करून आपापल्या देशांमध्ये या शास्त्रांचा विकास केला. अध्ययनाव्यतिरिक्त आलेला विदेशातील दुसरा वर्ग भारताच्या भौतिक वैभवाने प्रभावित होऊन भारतातील संपत्ती मिळवण्याच्या उद्देशाने आला होता.
२. भारतीय ज्ञान-विज्ञानाचे माध्यम असलेली संस्कृत भाषा
२ अ. मोगल आणि इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारतातील सर्व व्यवहार अन् अध्ययन संस्कृत भाषेत होत असून प्रत्येक विद्वान व्यक्ती संस्कृतमध्ये पारंगत असणे : भारतामध्ये मोगल आणि इंग्रज येण्यापूर्वी अन् आल्यानंतर बर्याच काळापर्यंत संस्कृत भाषा प्रचलित होती. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत, तसेच अटक (पाकिस्तानातील शहर) ते कटक (ओडिशामधील शहर) सर्व विभिन्न भारतीय विद्यालयांमध्ये धर्म, दर्शन, विज्ञान इत्यादी विषयांचे माध्यम संस्कृत भाषाच होते. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, तसेच जैन अन् बौद्ध धर्मग्रंथ यांची रचना संस्कृत भाषेतच झाली आहे. व्यक्तीचे राज्य, मातृभाषा किंवा तिचा व्यवहाराचा विषय कोणताही असला, तरीही विद्वान म्हणवली जाणारी प्रत्येक व्यक्ती संस्कृतमध्ये पारंगत होती.
२ आ. भारतीय ऋषिमुनींनी आध्यात्मिक ज्ञानासह भौतिक ज्ञानालाही महत्त्व दिले असून त्यांनी रचलेले ग्रंथ पूर्वीपासूनच पूर्ण विश्वाचे मार्गदर्शक ठरणे : आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी आध्यात्मिक ज्ञानासह भौतिक ज्ञानालाही तेवढेच महत्त्व दिले आहे. कश्यप, सुश्रुत, चरक, कणाद, आर्यभट्ट आदी ऋषींचे शोधग्रंथ मूळ रूपाने संस्कृत भाषेतच सुव्यवस्थित लिहिलेले आहेत. युरोपीय औद्योगिक क्रांतीच्या पूर्वीपासून विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये हे ग्रंथ पूर्ण विश्वाचे मार्गदर्शक ठरले आहेत.
३. संस्कृत भाषेच्या र्हासाची कारणे
३ अ. विदेशी आक्रमणकर्त्यांनी भारतीय गुरुकुलपद्धत बळजोरीने नष्ट करणे : भारतामध्ये साम्राज्य स्थापित करणारे विदेशी आक्रमणकर्ते हे जाणून होते की, भारत ज्ञान, विज्ञान आणि आध्यात्मिक क्षेत्र यांमध्ये पुष्कळ श्रेष्ठ आहे. यासाठी भारतियांची श्रेष्ठता आणि संस्कृती समाप्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी गुरुकुलपद्धत बळजोरीने नष्ट केली.
३ आ. इंग्रजी भाषा अवगत असणार्यांना उच्च पदाची प्रलोभने दाखवल्यामुळे संस्कृत भाषेचा र्हास होणे : इंग्रजी आक्रमणकर्त्यांनी संस्कृतच्या जागी इंग्रजी भाषा अवगत असणार्यांना शासकीय नोकरी, तसेच उच्च पदाची प्रलोभने दाखवून प्रतिष्ठित केले. त्यामुळे इंग्रजी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त होऊन संस्कृत भाषा हळूहळू नष्ट होऊ लागली.
३ इ. संस्कृत भाषा शैक्षणिक दृष्टीकोनातून वगळली गेल्याने देशात प्रांतिक संकुचितता निर्माण होणे : पूर्वी कोणतीही काश्मिरी व्यक्ती तमिळ व्यक्तीला भेटल्यावर अगदी मातृभाषेत किंवा क्षेत्रीय भाषेत बोलल्याप्रमाणे सहजतेने संस्कृत भाषेत आपल्या भावना व्यक्त करत असे. आता आपल्या शैक्षणिक दृष्टीकोनातून संस्कृत भाषा वगळली गेली. त्यामुळे आपल्या देशातील विभिन्न प्रांतातील व्यक्तींच्या भावना व्यक्त करण्याचे माध्यम संपुष्टात आले. एक व्यक्ती तमिळ, काश्मिरी, पंजाबी, हिंदी अशा अनेक भाषा शिकू शकत नाही. अखेर आम्ही भारतीय केवळ काश्मिरी, पंजाबी, तमिळी, मराठी इत्यादी ‘प्रांतिक भाषिक’ म्हणूनच राहिलो. अशा प्रकारे भारतमातेच्या विभिन्न प्रांतांची माळ जोडलेली संस्कृत भाषारूपी दोर कुटील इंग्रजांनी तोडली.
४. आधुनिक वैज्ञानिकांच्या दृष्टीकोनातून संस्कृत भाषेचे महत्त्व
४ अ. सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा सुस्पष्ट असून ती बोलल्याने जिभेतील मांसपेशीच्या हालचाली होऊन तिच्या उच्चाराने स्मरणशक्ती वाढणे : पाश्चिमात्य देशांतील वैज्ञानिकांनी विविध अनुसंधानात (अभ्यासात) संस्कृत ही भाषा विश्वातील सर्व भाषांमध्ये सर्वाधिक स्पष्ट आणि वैज्ञानिक भाषा असल्याचे मान्य केले आहे. संस्कृत भाषेमध्ये ऐकणे, लिहिणे आणि वाचणे यांमध्ये कोणतेही अंतर नाही. ही संगणकासाठी उपयुक्त भाषा आहे. विश्वामध्ये प्रथम लिखित साहित्य संस्कृत भाषेतील देवनागरी लिपीमध्ये उपलब्ध आहे. विश्वभरातील प्रचलित भाषांमधील सर्वाधिक भाषांमध्ये संस्कृत शब्दांचा समावेश आहे.
४ आ. संस्कृत भाषेमध्ये भारताला आध्यात्मिक आणि भौतिक विकास प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य असणे : विश्वातील काही विश्वविद्यालयांमध्ये संस्कृत शिकवले जात आहे. अमेरिकेतील ‘नासा’ (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन) नावाची संस्था संस्कृत भाषेतील प्राचीन पंडुलिपीचा शोध घेत आहे. भारताने ज्या संस्कृत भाषेच्या बळावर विश्वगुरूचे सिंहासन प्राप्त केले आहे, त्याचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. संस्कृत भाषेत आपल्याला आध्यात्मिक आणि भौतिक विकासात अग्रेसर होण्यासाठीचे पूर्ण सामर्थ्य आहे. (संस्कृतमध्ये अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीही समाविष्ट आहेत.)
५. संस्कृत भाषेचे लाभ
अ. संस्कृत भाषा बोलल्याने जिभेतील सर्व मांसपेशीच्या हालचाली होतात.
आ. संस्कृत शिकल्याने स्मरणशक्ती वाढते.
इ. संस्कृत भाषेचे वाक्य अल्प शब्दांमध्ये संपूर्ण अर्थाने परिपूर्ण होते.’
– डॉ. ब्रजबिहारी पांडेय, संपादक (साभार : ‘पुष्कर वेद प्रदीप’, पुष्कर (वर्ष ११, अंक ५.८.२०२०))
संपादकीय भूमिकादेववाणी संस्कृत भाषेचे लाभ लक्षात घेऊन शासनाने ती देशात सर्वत्र शिकवून तिला संजीवनी द्यावी, ही संस्कृतप्रेमींची अपेक्षा ! |