पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांचा गौतमारण्य आश्रम आणि तेथील परिसर यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

१०.४.२०२२ या दिवशी मला पानवळ, बांदा येथील संत प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) माई (पू. (सौ.) लक्ष्मी रघुवीर नाईक) यांच्यासह बांद्याला जाण्याचा योग आला. तेव्हा बांद्याला श्रीराममंदिरात श्रीरामनवमी होती. प.पू. दास महाराज यांचा गौतमारण्य आश्रम, तेथील प्रभु श्रीरामाचे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर यांचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

कु. मधुरा भोसले

१. गौतमारण्य आश्रम परिसरातील भूमी

मुख्य रस्त्यातून आत वळल्यावर वनराईच्या प्रदेशात आपले आगमन होते. या प्रदेशातील भूमी पाहिल्यावर मनाला नीरव शांतता जाणवते. येथे वहाणारा वारा जेव्हा अंगाला स्पर्श करून जातो, तेव्हा अंगावर रोमांच येतात. या भूमीत पाऊल ठेवताच एक विलक्षण शक्ती देहात हळूवारपणे जातांना जाणवते. ही भूमी पहाता क्षणी ‘आपण ऋषींच्या तपोभूमीत आलो आहोत’, अशी आपल्याला अनुभूती येते. ‘या भूमीत अनेक वर्षांपासून ऋषी तप करत आहेत’, असे सूक्ष्मातून जाणवते. आश्रमाच्या बाजूला बांधलेल्या लहानशा इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर ध्यान लागते आणि तेथे देवतेचे चित्र नसूनही ध्यानमंदिरात जाणवते तशी दिव्य स्पंदने जाणवतात.

२. गौतमारण्य आश्रम

या ठिकाणी मला एका ऋषींच्या पर्णकुटीचे दर्शन झाले. या आश्रमाच्या वास्तूत प्रवेश करताच मनाला आनंद आणि शांती यांची अनुभूती येते. प.पू. दास महाराज यांच्या गौतमारण्य आश्रमातील ध्यानमंदिर अत्यंत जागृत आहे. तेथे दैवी शक्तीचा वास आहे. त्यामुळे आश्रमातील ध्यानमंदिरात दिव्यत्वाची प्रचीती देणारा दैवी सुगंध सतत दरवळत असतो. त्याचप्रमाणे या आश्रमात प्रवेश करताच मनातील सर्व निरर्थक विचार थांबून मनाला निराळीच शांती जाणवते. या आश्रमाकडे पाहिल्यावर आश्रमात चैतन्यमय पिवळसर रंगाची दैवी ऊर्जा कार्यरत असल्याचे जाणवते, तसेच आश्रमाच्या भोवती सोनेरी रंगाच्या दैवी ऊर्जेचे वलय कार्यरत असल्याचे जाणवते. आश्रमाभोवती असणार्‍या दैवी कवचामुळे आश्रमाचे वातावरणातील रज-तम लहरी आणि वाईट शक्ती यांच्या पासून रक्षण होते. त्यामुळे आश्रम जरी स्थुलातून दिसायला साधा दिसत असला, तरी त्याचे आध्यात्मिक सामर्थ्य पुष्कळ असल्यामुळे हा गौतमारण्य आश्रम मोक्षप्राप्तीसाठी तळमळणार्‍या मुमुक्षूंना साधना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

३. प्रभु श्रीरामाचे मंदिर

प्रभु श्रीरामाच्या मंदिरातील रामपंचायतनाच्या मूर्ती पाहून मला पुष्कळ आनंद जाणवला. त्याचप्रमाणे या मंदिरात श्रीराम त्याच्या संपूर्ण शक्तीसह विराजमान असल्यामुळे हे मंदिर अन्य मंदिरांपेक्षा जागृत असल्याचे जाणवले. या मंदिराच्या गाभार्‍यातील प्रभु श्रीरामासमवेत असणार्‍या लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्ती अत्यंत सजीव वाटतात. त्याचप्रमाणे गाभार्‍यातील समर्थ रामदासस्वामींची मूर्तीही अत्यंत सजीव वाटते. प्रभु श्रीरामाच्या मूर्तीच्या समोर काही अंतरावर दास मारुतीची देवळी आहे. येथे प्रभु श्रीरामाची दास्यभक्ती करण्यात मग्न असणार्‍या दासमारुतीचे अस्तित्व जाणवते. या मारुतीचे दर्शन घेतल्यावर आपल्याही हृदयात प्रभु श्रीराम नामाचा जयघोष होऊन भक्ती जागृत होते. सीतेसह सिंहासनाधिष्ठित असणार्‍या राजारामाचे रूप हे अयोध्येत रामराज्य चालवणार्‍या प्रभु श्रीरामाचे अत्यंत कल्याणकारी आणि समष्टी रूप आहे. सीतेसह सिंहासनाधिष्ठित असणार्‍या राजारामाचे रूप अत्यंत दुर्मिळ आणि परमकल्याणकारी आहे. ‘या रूपातील प्रभु श्रीराम पूर्णपुरुषोत्तम असून तो पृथ्वीवर लवकरच रामराज्य म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी मोलाचे कार्य करणार आहे’, असे मला मनोमन जाणवले. मंदिरामध्ये प्रभु श्रीरामाचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत असल्यामुळे या मंदिराच्या चारही बाजूंनी तुळशीची लहान लहान रोपे आपोआप उगवून आलेली आहेत. ‘मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीमध्ये विराजमान असणारा हनुमान सूक्ष्मातून प्रतिदिन या तुळशीच्या रोपांची पाने आणि मंजिरी एकत्रित करून त्यांचा सुंदर तुळशीहार बनवून तो प्रभु श्रीरामाच्या गळ्यात घालतो’, असे मला जाणवले. धन्य तो हनुमान आणि धन्य त्याची भक्ती !

४. केळी आणि अन्य झाडांची बाग

या बागेमध्येही शाकंबरी देवीचे अस्तित्व जाणवत होते. त्याचप्रमाणे बागेतील विहीर पाहिल्यावर ते पाणी नसून औषधी गुणधर्मांनी युक्त असलेले तीर्थ असल्याचे जाणवले. ‘रामभक्त हनुमान या बागेतील फळे शांतपणे खातो आणि त्यानंतर या विहिरीतील तीर्थ भावपूर्णरित्या प्राशन करून नंतर जातो’, असे दृश्य मला दिसले. (प्रत्यक्षातही या बागेत अनेक वानरे येतात; मात्र ती अन्य बागेत जसा हैदोस घालतात, तसा न घालता या बागेतील फळे शांतपणे खाऊन नंतर विहिरीचे पाणी पिऊन तेथून शांतपणे जातात’, असे प.पू. दास महाराज यांनी मला नंतर सांगितले.

५. बागेतील परिसर

येथील बागेतील विहीर आणि तेथून जाणारा कालवा येथे मला जलदेवतेचे स्थान जाणवले अन् वरुणदेवतेचे अस्तित्व जाणवले. बागेतील परिसरातही माझे ध्यान लागून मला आनंद जाणवत होता. येथे मला सूक्ष्मातून १० ते १२ फूट लांबीच्या पिवळ्या धमक नागांची जोडी दिसली. ‘ही नागदेवता येथे फार पूर्वीपासून आहे. हे क्षेत्र तिचे असून ती या क्षेत्राची क्षेत्रपाल देवता आहे आणि ती या क्षेत्राचे रक्षण करते’, असे मला जाणवले. (याविषयी मला प.पू. दास महाराज म्हणाले की, ‘या परिसरात अनेकांना पिवळ्या धमक नागांच्या जोडीचे दर्शन झाले आहे. – कु. मधुरा भोसले)

गौतमारण्याच्या परिसरातील भूमीमध्ये अनेक दैवी शक्तींचा वास जाणवतो. तसेच ‘येथील झाडेही नामजप आणि ध्यानधारणा करतात’, असे जाणवते. हा संपूर्ण परिसर आपले मन प्रफुल्लित करून आपल्या मनात साधना करण्याचा नवा उल्हास निर्माण होतो.

कृतज्ञता

‘दिव्यत्वाची अनुभूती देणारा गौतमारण्य आश्रम आणि त्याचा परिसर यांचे जतन करणारे थोर संतदांपत्य प.पू. दास महाराज आणि पू. माई यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे’, असे जाणवते.

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(२४.६.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.