परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजर्‍या झालेल्या रथोत्सवाच्या वेळी रथाची सजावट करतांना श्री. विठ्ठल कदम यांनी अनुभवलेली भावस्थिती !

‘वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्त त्यांचा ‘रथोत्सव’ साजरा करण्यात आला. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्री. विठ्ठल कदम यांना रथाची सजावट करण्याची सेवा मिळाली होती. ती सेवा करतांना त्यांनी अनुभवलेली भावस्थिती आणि रथोत्सवाच्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. रथाची सजावट करतांना अनुभवलेली भावस्थिती

श्री. विठ्ठल कदम

१ अ. जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी रथाची सजावट करतांना झोप येणे; मात्र झोपायला गेल्यावर झोप न येता डोळ्यांसमोर सतत रथ दिसणे आणि ‘परात्पर गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) त्या रथात विराजमान झालेले कधी पहातो’, असे वाटणे : ‘जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी रात्री मी रथाची सजावट करत होतो. ती सेवा करतांना मला झोप येत होती; म्हणून ‘थोडा वेळ झोपूया’, असा विचार करून मी झोपण्यासाठी गेलो; मात्र मला झोप लागली नाही. माझ्या डोळ्यांसमोर सतत रथच दिसत होता. माझ्या मनाला केवळ एकच ध्यास लागला होता, ‘कधी एकदा मी परात्पर गुरुदेवांना त्या रथात विराजमान झालेले पहातो.’ माझे डोळे त्या क्षणाची आतुरतेने वाट पहात होते. त्यामुळे मला झोप लागली नाही.

१ आ. रथाची सजावट करतांना मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण होत होते.

२. रथोत्सवाला आरंभ झाल्यानंतर आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

२ अ. संत जनाबाई यांच्या अभंगातील ओळी आपोआप मुखात येणे : भूवैकुंठ असलेल्या रामनाथी आश्रमातून रथोत्सव सोहळ्याला आरंभ झाल्यावर माझी भावजागृती झाली. माझ्या मुखातून ‘देव भावाचा भुकेला । सोडूनी आला हो वैकुंठ ।।’ म्हणजे ‘देव भावाचा भुकेला आहे. त्यासाठी तो वैकुंठ सोडून आला’, या संत जनाबाई यांच्या अभंगातील ओळी आपोआप म्हटल्या जात होत्या.

२ आ. रथोत्सवाच्या वेळी श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचा प्रसंग डोळ्यांसमोर येऊन ‘स्वतः सुदामा आहे’, असे वाटून भावजागृती होणे आणि ‘श्रीकृष्णाचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) रूप कधी पहातो’, असे वाटून कंठ दाटून येणे : रथोत्सवासाठी गुरुदेवांचा रथ रामनाथी आश्रमातून बाहेर पडत असतांना माझ्या डोळ्यांसमोर श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचा प्रसंग आला. ‘मी सुदामा असून श्रीकृष्णाच्या महालाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा आहे’, असे मला जाणवले. ‘मी या डोळ्यांनी श्रीकृष्णाचे रूप कधी पहातो’, असे मला झाले होते. माझा कंठ दाटून येत होता. रथोत्सवाच्या आरंभापासून ते रथोत्सव संपेपर्यंत मी याच भावावस्थेत होतो. गुरुमाऊलीला पाहून माझा भाव जागृत होत होता.

२ इ. ‘श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहे’, हा प्रसंग डोळ्यांसमोर येऊन चैतन्य जाणवणे : जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तेव्हा साक्षात् माझी विष्णुस्वरूप गुरुमाऊली तेथे आहे, असे चित्र डोळ्यांसमोर येऊन ‘श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहे’, हा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आला. रथोत्सवाच्या वेळी मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते.

परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच या जिवाला साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊली विराजमान होणार असलेल्या रथाची सेवा करण्याचे परम भाग्य लाभले; त्याबद्दल त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक