१५ ऑगस्ट २०२२ या दिवशी भारताचा ७५ वा ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने…
१. स्वातंत्र्यानंतरचा १५ वर्षांचा काळ फुकट घालवून देशावर नामुष्की येऊ देणारे काँग्रेसचे तत्कालीन शासनकर्ते !
‘वर्ष १९४७ ते १९६२ हा काळ फुकट गेला. राष्ट्राला बलिष्ठ करण्याच्या काळात लावण्या नि तमाशे यांच्या महोत्सवाला वाहवा प्राप्त झाली आणि देशाला नामुष्कीला तोंड द्यावे लागले. ‘हिंदुस्थान ‘सॉफ्ट स्टेट’ (मुळमुळीत) आहे’, अशी भावना सर्वत्र पसरली. त्याचा परिणाम असा झाला की, हिंदुस्थानने अणूबाँब निर्माण करावा कि नाही, याविषयी अणूबाँबचा वापर करणारे देश भारतावर दबाव टाकू लागले. हिंदुस्थानचा आर्थिक कायापालट करण्याच्या घोषणा करणार्या काँग्रेसवाल्यांनी तो कायापालट केला नाहीच; पण सामरिक शक्तीचीही उपासना केली नाही. नुसत्या घोषणा देणे, पंचतारांकित संस्कृतीतील जीवन जगण्यासाठी दरबारी नेत्यांचा वर्ग निर्माण झाला.
(स्वातंत्र्यानंतरच्या महत्त्वाच्या काळात काँग्रेसींनी देश घडवण्यासाठी, तसेच देशाला सामरिकदृष्ट्या बलशाली करण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळेच भारतावर अन्य छोटे छोटे देशही डोळे मोठे करून बघण्याचे धाडस करतात. भारताला तत्कालीन काँग्रेसींनी बलशाली न केल्याने देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाली. त्यामुळे आतातरी भारतियांनी बलशाली राष्ट्राच्या उभारणीसाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणून त्यासाठी प्रयत्न करावेत ! – संपादक)
२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य देशांशी मित्रता करण्याविषयी सांगितलेले मुत्सद्दीपणाचे सूत्र !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मडुरे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे केलेल्या भाषणात त्यांनी मित्रदेश करण्याविषयी दिलेला सल्ला सर्वांनी कायम लक्षात ठेवला पाहिजे. ते म्हणाले होते, ‘‘In practical politics, allianes are to be based on any point of common interests in spite of the fact of the conflict in all other interests between the allied parties.’’ (अर्थ : व्यावहारिक राजकारणात मित्रपक्षांमध्ये जरी भेद असले, तरी त्यांच्यातील युती ही एखाद्या सर्वसमावेशक हिताला केंद्रभूत करून केलेली असते.)