बंडखोरी करून येतो, त्याला सर्वांत आधी मंत्रीपद मिळते ! – अपक्ष आमदार बच्चू कडू

बच्चू कडू

मुंबई – धोका देणार्‍यांचेच राज्य आहे. जो अधिक धोका देणार, तो मोठा नेता होणार. धोका दिल्यानेच अनेक पक्ष मोठे झाले. भाजप, शिवसेना किंवा अन्य कुणी असो, बंडखोरी सगळीकडे झाली आहे. कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत ? बंडखोरांचेच  राज्य आहे. बंडखोरी करून येतो, त्याला सर्वांत आधी मंत्रीपद मिळते, अशी सर्वपक्षीय राजकारणाविषयीची प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे व्यक्त केली.

मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी १० ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. या वेळी आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘‘जो विलंबाने आला, त्याला पहिल्या पंगतीत बसवले आणि जो पहिला गेला, त्याला शेवटच्या रांगेत बसवले. राजकारणात असेच चालू रहाते. मी केवळ मंत्रीपदासाठी शिंदे गटाला पाठिंबा दिला नव्हता. काही सूत्रांच्या आधारे पाठिंबा दिला होता. ती सूत्रे विचारात घेतली नाहीत, तर वेगळा विचार करू.’’