बलात्काराच्या आरोपात अर्भकाचा ‘जनुक’ आरोपीशी जुळला नाही, तरी पीडितेच्या जबाबावर अविश्वास दाखवता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – ‘जनुक’ (डी.एन्.ए.) चाचणीचा निष्कर्ष ‘पॉझिटिव्ह’ आला, तर संबंधित आरोपाविरुद्धचा तो पुरावा ठरू शकतो; परंतु चाचणीचा निष्कर्ष ‘निगेटिव्ह’ आला, तर रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या अन्य सूत्रांचा विचार करावा लागेल. जामिनासाठी अर्ज करणारा बाळाचा पिता नसल्याचा निष्कर्ष ‘डीएन्ए’ चाचणीतून समोर आला, तरी पीडितेच्या साक्षीवर अविश्वास दाखवता येणार नाही, असा निष्कर्ष ९ ऑगस्ट या दिवशी बलात्काराच्या सुनावणीवर मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवला. नवी मुंबईतील एकाने बलात्काराच्या आरोपाप्रकरणी जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळतांना मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी टिपणी केली.

‘जनुकीय चाचणी गर्भाच्या चाचणीशी जुळत नसल्याने पीडितेचा बलात्काराशी संबंध जोडला जाऊ नये’, हा आरोपीचा युक्तीवाद न्यायालयाने फेटाळला. जनुकीय विश्लेषणाचा पुरावा पुष्टीकरणासाठी वापरला जाऊ शकतो. ‘जनुकीय चाचणी पुष्टी देणारा पुरावा म्हणून वापरू शकतो’, असे न्यायमूर्तींनी सांगितले.