निरपेक्ष, निर्मळ आणि आश्वासक प्रीतीची ओवाळणी देऊन बहिणींना (साधिकांना) निश्चिंतता देणारे त्यांचे भाऊ सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी (वय २६ वर्षे ) !

सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ जोशी निर्मळ मनाचे, गुरूंना ‘श्री’, असे संबोधून त्यांचे सतत स्मरण करणारे, ‘जय हो !’, असे म्हणून गुरूंचा जयजयकार करणारे, आपल्या निर्मळ हास्याने समोरच्याला त्याच्या नकारात्मक स्थितीतून बाहेर काढून त्याला ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग ।’, या उक्तीप्रमाणे अनुभूती देणारे आणि विशेष म्हणजे त्यांच्या बहिणींना (साधिकांना) आधारभूत ठरणारे, असे संत आहेत. आजपर्यंत श्रींच्या कृपाशीर्वादाने अनेकांना पू. दादांविषयी अनेक अनुभूती आल्या आहेत.

पूर्वी पू. सौरभदादा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. आता ते पिंगुळी (तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे वास्तव्यास आले आहेत. पू. दादा रामनाथी आश्रमात असतांना काही साधिका प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी पू. दादांना न चुकता राखी बांधायच्या. आताही काही साधिका त्यांना अन्य ठिकाणांहूनही राखी पाठवतात. काही जणी मला भ्रमणभाषवर संपर्क करून पू. दादांचे आशीर्वाद घेतात. ११.८.२०२२ या दिवशी रक्षाबंधन आहे. त्या निमित्त एका साधिकेने पू. सौरभदादांनी रामनाथी आश्रमात असतांना केलेल्या कृपेविषयी पत्ररूपाने व्यक्त केलेली कृतज्ञता आणि अन्य साधिकांना त्यांच्या प्रीतीविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

साधिकांच्या अडचणी ओळखून त्यांना निश्चिंत करणारे पू. सौरभ जोशी !

पू. सौरभ जोशी

१. पू. सौरभदादांनी साधिकेला ‘भाऊ, भाऊ’, असे म्हणून ‘मी तुझा भाऊ असल्याने काळजी करू नकोस’, असे आश्वस्त करणे

‘एकदा एक साधिका पू. सौरभदादांना भेटायला आली होती. ती साधिका थोडी विचारांत असल्याचे मला जाणवले. तेव्हा पू. दादा तिच्याकडे बघून ‘भाऊ, भाऊ’, असे म्हणाले. मी तिला म्हणाले, ‘‘पू. दादा तुम्हाला सांगत आहेत, ‘ते तुमचे भाऊ आहेत’, म्हणजे तुम्ही त्यांच्या ताई झालात ! त्यामुळे आता काळजी करू नका.’’ त्या वेळी पू. दादांनी स्मित हास्य केले.

श्री. संजय जोशी

२. पू. सौरभदादांनी एका साधिकेकडे एकटक पहाणे आणि ‘ताईची काळजी वाटते का ?’, असे विचारल्यावर त्यांनी होकार देणे

एकदा पू. दादांना भेटायला काही साधक आले होते. त्या वेळी त्यांच्यातील एका साधिकेकडे पू. दादा बराच वेळ एकटक बघत होते. तेव्हा मी पू. दादांना विचारले, ‘‘पू. दादा, तुम्हाला ताईची काळजी वाटते का ?’’ त्यावर ते ‘हो’ म्हणाले.

त्यानंतर सर्व साधक जायला निघाले, तरीही पू. दादा त्या साधिकेकडे पहातच होते. तेव्हा मी त्यांना पुन्हा विचारले, ‘‘पू. दादा, तुम्हाला ताईची काळजी वाटते का ?’’ त्यावर ते पुन्हा ‘हो’ म्हणाले. ‘पू. दादा साधिकेला जाऊ देत नाहीत’, हे पाहून मी त्यांना म्हणालो, ‘‘ताईला आता जाऊ दे. ती नंतर पुन्हा येईल’’, तरीही पू. दादा सिद्ध नव्हते. शेवटी त्या साधिकेचे आश्रम पहाणे शेष असल्याने ती पू. दादांना भेटून गेली.

२ अ. २ दिवसांनी साधिका पुन्हा भेटायला आल्यावर पू. सौरभदादांनी वरीलप्रमाणे कृती करणे : २ दिवसांनी पुन्हा ती साधिका पू. दादांना भेटायला आली. त्या वेळी पू. दादा पूर्वीप्रमाणेच तिच्याकडे एकटक बघू लागले. तेव्हा मी त्यांना पुन्हा विचारले, ‘‘पू. दादा, तुम्हाला ताईची काळजी वाटते का ?’’ त्यावर ते पुन्हा ‘हो’ म्हणाले.

२ आ. एका संतांचे साधिकेविषयीचे आशीर्वादात्मक बोल ऐकल्यावर पू. सौरभदादांनी निश्चिंत झाल्याप्रमाणे हसून साधिकेला जाण्यास अनुमती देणे : पू. दादांचे ‘हो’, असे उत्तर ऐकल्यावर त्या साधिकेचे डोळे पाणावले आणि ती म्हणाली, ‘‘माझी एका संतांशी भेट झाली. तेव्हा मी त्यांना माझ्या अडचणी सांगितल्या. त्यावर ते संत मला म्हणाले, ‘‘तुम्ही काही काळजी करू नका. सर्व अडचणी काही मासांत सुटतील.’’

आम्ही बोलत असतांना पू. दादांचे लक्ष साधिकेकडे होते. जेव्हा तिने संतांनी सांगितलेली ‘तुम्ही काही काळजी करू नका. सर्व अडचणी काही मासांत सुटतील’, ही वाक्ये उच्चारली, तेव्हा पू. दादा मोठ्याने हसले आणि त्या साधिकेला जाण्यास अनुमती दिली.
हे पाहून ती साधिका मला म्हणाली, ‘‘मला काही अडचणी आहेत’, हे मी पू. दादांना न सांगताही त्यांनी ओळखले; म्हणून मला भरून आले. संतांचे आशीर्वादात्मक बोल ऐकल्यावर पू. दादांनी मला जाण्याची अनुमती दिली, म्हणजे ते निश्चिंत झाले की, आता ताईची काळजी करण्यासारखे काहीही उरले नाही.’’ अशा प्रकारे पू. दादांनी दिलेल्या आधाराविषयी त्या साधिकेने कृतज्ञता व्यक्त केली.

२ इ. वरील प्रसंग आठवल्यावर निश्चिंतता वाटत असल्याचे साधिकेने सांगणे : त्यानंतर साधारण २ वर्षांनी एकदा माझी त्या साधिकेशी भेट झाली. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘आता मला काही अडचण आली की, मी (वरील) प्रसंग आठवते. त्यामुळे मला निश्चिंतता लाभते.’’

३. कृतज्ञता

गुरुमाऊलीच्या कृपेने पू. दादांच्या सेवेची संधी मिळल्यामुळे मला पू. दादांकडून अनेक प्रसंगांतून शिकता आले. ‘साधकांचा संतांप्रतीचा भाव कसा असतो आणि कृपाळू गुरुमाऊली संतांच्या माध्यमातून साधकांची काळजी कशी घेते !’, हेही गुरुमाऊलीनेच मला शिकवले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्री. संजय जोशी (पू. सौरभ जोशी यांचे वडील), पिंगुळी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (२६.७.२०२२)


सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाईआजी (वय ७५ वर्षे) यांनी प्रत्येक वर्षी पू. सौरभ जोशी यांना राखी बांधून त्यांचा आशीर्वाद घेणे

पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई

‘सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाईआजी (वय ७५ वर्षे) पूर्वी गोवा येथे त्यांच्या घरी रहात होत्या. त्या वेळी त्या पू. सौरभदादांसाठी राखी पाठवत असत. पू. देसाईआजी रामनाथी आश्रमात वास्तव्याला आल्यावर त्या प्रतिवर्षी पू. दादांना राखी बांधायला येत असत. राखी बांधून झाल्यावर त्या पू. दादांना प्रार्थना करत असत, ‘‘पू. दादा, तुमच्याविना आमचे कोण आहे ? आमच्यावर तुमचा आशीर्वाद असू द्या !’’

पू. देसाईआजींची प्रार्थना ऐकून मी त्यांना म्हटले, ‘‘आजी, पू. दादा तुमच्यापेक्षा वयाने पुष्कळ लहान आहेत. तुम्ही त्यांना प्रार्थना न करता आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या.’’ त्यावर पू. आजी म्हणाल्या, ‘‘पू. दादा वयाने लहान असले, तरी त्यांचा अधिकार पुष्कळ मोठा आहे.’’

– श्री. संजय जोशी, पिंगुळी. (२६.७.२०२२)


पू. सौरभ जोशी यांनी वेळोवेळी दिलेला चैतन्यदायी सत्संग आणि प्रीती यांबद्दल साधिकेने त्यांच्या चरणी अर्पण केलेले पत्ररूपी कृतज्ञतापुष्प !

कु. पूनम मुळे

पू. सौरभदादा,
नमस्कार !

पू. दादा, मला तुमची आठवण येते. तुम्ही मला तुमचा प्रीतीमय सहवास आणि आनंद दिलात. तुम्ही वेळोवेळी तुमच्या या बहिणीकडे (माझ्याकडे) लक्ष दिले; परंतु मी मात्र स्वतःहून तुमच्याकडे येऊन तुमचा सत्संग मिळवण्यास न्यून पडले. तुम्हीच माझ्या मनाची स्थिती ओळखून काहीतरी निमित्त काढून श्री. संजय जोशीकाका (पू. सौरभ जोशी यांचे वडील) यांच्या माध्यमातून मला बोलावून घेत होता. त्यामुळे मला तुमचा सत्संग मिळायचा. पू. दादा, तुम्ही मला आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ साहाय्य केले. तुम्ही मला वेळोवेळी आधार आणि भरभरून प्रेम दिलेत, तरीही मी तुम्ही सांगितलेले अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असलेले प्रयत्न करण्यात न्यून पडते.

पू. सौरभदादा, ‘तुमच्या या छोट्या आणि अज्ञानी बहिणीवर तुमची कृपादृष्टी सदैव असू द्या. तुम्हाला आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी साधना करण्यासाठी मला बळ द्या’, हीच आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.

सौ. प्राजक्ता जोशीकाकू आणि श्री. संजय जोशीकाका (पू. सौरभदादा यांचे आई-वडील), ‘तुम्हीही मला वेळोवेळी आधार आणि प्रेम दिलेत’, यासाठी कृतज्ञता !

– आपलीच, कु. पूनम मुळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा .(२५.७.२०२२)