पाळा (जिल्हा अमरावती) येथे महिलेला अमानुष मारहाण करून नदीत फेकले; ४ दिवसांनंतरही महिला बेपत्ता !

अमरावती – जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पाळा येथे एका ३० वर्षीय महिलेला तिच्यासमवेत रहाणार्‍या पाळा येथील धनराज चढोकार (वय ३७ वर्षे) व्यक्तीने अमानुष मारहाण करून माळू नदीत फेकून दिले. ४ दिवसांनंतरही त्या महिलेचा शोध लागलेला नाही. या प्रकरणी ८ ऑगस्टच्या रात्री धनराज याच्यावर गुन्हा नोंद करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

धनराज ७-८ मासांपासून या महिलेसमवेत रहात होता. या महिलेला ११ वर्षांचा मुलगा आहे. ६ ऑगस्ट या दिवशी सकाळी महिलेच्या मुलाने घरात पाळणा बांधून मागितला. त्यावरून धनराज आणि महिला यांच्यात वाद झाला. धनराज याने महिलेला अनामुष मारहाण करून मुलाला घेऊन सालबर्डी येथील यात्रेसाठी निघून गेला. सायंकाळी मुलाला घेऊन घरी परतला असता महिला घरातच पडून होती. धनराज याने मुलाला समवेत घेऊन तिला मोर्शी येथील एका खासगी रुग्णालयात आणले; मात्र आधुनिक वैद्यांनी तिला सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे धनराज याला ‘महिलेचा मृत्यू झाला असावा’, असा संशय आला. त्यानंतर त्याने महिलेला माळू नदीत फेकल्याचा संशय आहे.