अक्कलकोट तालुक्यात पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा !

अक्कलकोट तालुक्यात पुराच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा

सोलापूर – तुळजापूर तालुक्यात मागील २ दिवसांपासून सतत पाऊस चालू असल्याने पितापूर (तालुका अक्कलकोट) येथील हरणा नदीला पूर आला आहे. कूरनूर धरणाच्या ‘बॅक वॉटर’चा हा परिसर असल्याने पुराचा धोका अधिक आहे. नदीवर पूल नसल्याने अनेक वर्षांपासून या गावाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ९ ऑगस्ट या दिवशी निधन झालेल्या व्यक्तीची अंत्ययात्रा पितापूरकरांना पुराच्या पाण्यातून स्वत:चा जीव धोक्यात घालून काढावी लागली. (अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार्‍या स्वतंत्र भारतात नागरिकांची असुविधा ! – संपादक)

२५ वर्षांपासून पूल बांधण्याची मागणी अपूर्णच !

पितापूरकरांना वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मागील २५ वर्षांपासून लढा द्यावा लागत आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत या मागणीचा विचार केलेला नाही. नागरिकांना पितापूरहून सोलापूर येथे येण्यासाठी हन्नूर आणि नन्हेगावमार्गे जावे लागत आहे. हा प्रवास धोकादायक असून अधिक अंतराचा आहे. २५ वर्षांपासून पुलाची मागणी पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये अप्रसन्नता आहे.