दिवसातून ४ – ४ वेळा खाणे टाळा !

वैद्य मेघराज पराडकर

१. आरोग्य चांगले रहाण्यासाठी दिवसभरात किती वेळा आहार घ्यावा ?

‘दिवसातून केवळ २ वेळा आहार घेणे’, हे आदर्श आहे. यामुळे शरीर निरोगी रहाते. हे शक्य नसल्यास जास्तीतजास्त ३ वेळा आहार घ्यावा. सकाळी शौचाला साफ झालेले असणे, शरीर हलके असणे आणि चांगली भूक लागलेली असणे, ही लक्षणे निर्माण झाल्यावरच सकाळचा अल्पाहार करावा. ही लक्षणे निर्माण झाली नाहीत, तर सकाळी १० वाजेपर्यंत काही खाऊ नये. तहान लागल्यास केवळ गरम पाणी प्यावे. सकाळी १० वाजल्यानंतर अल्पाहार (‘अल्प’ आहार) करावा. अशा वेळी दुपारचे जेवण साधारण १ ते २ वाजता घ्यावे. सायंकाळी ७ वाजता रात्रीचे जेवण घ्यावे. असे ३ वेळा आहार घेणेही आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे.

२. खाण्याचे पदार्थ सहज उपलब्ध असले,तरी जास्त वेळा खाण्याचा मोह टाळा !

घरी डब्यांमध्ये खाऊ ठेवलेला असतो. काही वेळा नोकरीच्या ठिकाणी सकाळ-सायंकाळ चहा असतो. हॉटेलमध्ये कधीही खाण्याचे पदार्थ उपलब्ध असतात. पुष्कळ जण एका ठिकाणी रहातात, अशा ठिकाणी ४ – ४ वेळा आहार उपलब्ध असतो. असे असले, तरी ही केवळ सोय असते. ३ पेक्षा जास्त वेळा आहार घेणे किंवा दिवसभर खात रहाणे, हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. कधीतरी भूक लागली म्हणून किंवा वेगळेपणा म्हणून अतिरिक्त वेळी खाणे चालते; पण प्रतिदिन नेमाने जास्त वेळा खाणे टाळावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.८.२०२२)