नागपूर येथे ‘ॲमेझॉन आस्थापना’ची ३ कोटींची फसवणूक !

नागपूर – शहरातील औद्योगिक क्षेत्रातील हिंगणा रस्त्यावरील प्लॉट क्रमांक १६ येथील ‘रुक्मिणी मेटल अँड जॉसेस लिमिटेड’ कडून ॲमेझॉन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस प्रा. लि. नावाच्या आस्थापनाची जवळपास ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना ९ ऑगस्ट या दिवशी येथे उघडकीस आली आहे. ९ ते १३ एप्रिल २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

‘ॲमेझॉन’च्या ‘ऑनलाईन’ विक्रीच्या प्रणालीमध्ये आस्थापनाचे एकूण १२ ‘लॉगिन आयडी’ सिद्ध करून आरोपीने बनावट विक्रेते आणि ग्राहक यांचे खाते सिद्ध केले, तसेच ७ दिवसांत ५ सहस्र ७३१ बनावट रक्कम ‘ऑन डिलिव्हरी ऑर्डर’ देऊन त्याची विक्री न करता ‘ऑर्डर’ परत केल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘ॲमेझॉन’च्या ‘ऑटोमॅटीक रिफंड’ प्रणालीमधून ही रक्कम स्वत:च्या खात्यात वळवून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. ४ मासांनंतर हा प्रकार आस्थापनाच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.