स्वाईन फ्ल्यू हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णांची शिंक, खोकला, कपडे आणि हातांचा स्पर्श या गोष्टींपासून बचाव करणे आवश्यक !एकदा मनुष्याला स्वाईन फ्ल्यू आजार झाला की, तो पसरणे सोपे असते. बाधा झालेल्या रुग्णाची शिंक, खोकला, कपडे आणि हातांचा स्पर्श यांतून हे विषाणू सर्वत्र पसरतात. एकत्र जेवणे, एकाच पेल्यातून पाणी किंवा चहा पिणे, एकाच चमच्याने खाणे, एका पलंगावर झोपणे, एकच भ्रमणभाष संच वापरणे, सर्व प्रकारचे स्पर्श, एकमेकांचे कपडे वापरणे, हस्तांदोलन करणे, गर्दीतील वावर असे अनेक मार्ग त्यासाठी चालू शकतात. यातील कितीतरी गोष्टी या ‘आपण मागासलेले नसून सुधारलेले आहोत. भेदभाव किंवा अस्पृश्यता पाळत नाही’, हे दाखवण्यासाठी आजच्या काळात सर्रासपणे केल्या जातात. हे टाळले, तर केवळ स्वाईन फ्ल्यूच नव्हे, तर अन्य अनेक संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आपल्याला उत्तमरित्या करता येईल. – वैद्या सुचित्रा कुलकर्णी |
१. मानवी मन करत असलेल्या कल्पनेचा परिणाम !
‘एका बंदीवानाला मृत्यूची शिक्षा ठोठावली होती. त्यापूर्वी त्याला सांगण्यात आले होते की, तुला फाशीऐवजी नागदंश करवून मारण्यात येईल. त्याचे डोळे बांधून त्याला केवळ ‘सेफ्टी पिन’ टोचवली गेली, तरीही तो बंदीवान मृत्यू पावला. शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरिरात खरोखरच विष सापडले. त्याच्या मनातील भीतीने शरिराने स्वतःच विष निर्माण केले होते. ही गोष्ट गेले बरेच दिवस सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. तिची सत्यासत्यता पडताळून बघायला हवी, हे खरे असले, तरी ‘मानवी मन कल्पनेने काय करू शकते ?’, याची चुणूक यातून निश्चितच मिळते.
२. सामाजिक माध्यमांनी स्वाईन फ्ल्यूविषयी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे
मानवी मनाच्या या ‘मन चिंती तें वैरी चिंतीना ।’ (अर्थ : आपल्याला काही गोष्टींविषयी इतकी धास्ती वाटते आणि शत्रूलाही आपण इतके भितो की, त्यामानाने शत्रूच्याही मनात आपल्याला अपाय करण्याचा विचार येत नाही.) या वृत्तीचा प्रत्यय येतो, तो ‘स्वाईन फ्ल्यू’च्या मधूनमधून उचल खाणार्या साथीत ! वास्तविक १२ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात ४०० जणांना (‘या चारशेतील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे’, हे गृहित धरून) म्हणजे १ टक्का लोकांना एखाद्या रोगाची लागण होणे, याला ‘साथ’ म्हणायचे का ? हा पहिला प्रश्न ! दुसरा प्रश्न असा की, स्वाईन फ्ल्यू हा आजार प्रत्येक वेळी जीवघेणा असतो का ?, तर नाही. तो औषधांनी बरा होणारा आजार आहे. आजही मलेरिया आणि क्षयरोग यांची लागण त्याहून कितीतरी अधिक लोकांना होते. त्या आजारांतून मृत्यू होण्याची शक्यताही अधिक आहे. असे असतांनाही सामाजिक माध्यमांतून या साथीचा इतका गवगवा केला जातो की, भीतीची साथ मात्र नक्की पसरते !
३. स्वाईन फ्ल्यूच्या भीतीने प्रतिदिन ३०० रुग्ण १ मास येणे; पण एकही रुग्ण स्वाईन फ्ल्यूचा नसणे
२ वर्षांपूर्वीच्या अशाच भीतीच्या साथीत खासगी वैद्यकीय व्यवसाय करणार्या माझ्या एका मैत्रिणीला दिवसाला ३००-३०० रुग्ण बघावे लागत होते आणि तेही चांगले एक मास ! एरव्ही सर्दी-पडसे झाल्यावर दुकानातून २-४ गोळ्या घेऊन स्वचिकित्सा करणारे रुग्ण (अर्थात् हे चुकीचे आहे.) स्वाईन फ्ल्यूच्या भीतीने रुग्णालयात येत होते. आश्चर्य म्हणजे ‘यातील एकही रुग्ण स्वाईन फ्ल्यूचा नव्हता’, असे तिने सांगितल्याचे मला चांगले आठवते. (या रोगाचे प्रमाण किती अल्प आहे, हे समजण्यासाठी हा संदर्भ दिला.)
४. स्वाईन फ्ल्यू हा डुकरांचा आजार असल्याने तो डुकरे असलेल्या ठिकाणी पसरण्याची शक्यता असणे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक ठरणे
स्वाईन फ्ल्यू हा आजार मुळात डुकरांचा आजार आहे. त्याचे मूळ मेक्सिको देशातील आहे; पण आज पृथ्वी हे एक जागतिक खेडे झाले असल्याने कुठलेही आजार कुठेही पसरू शकतात. वर्ष २०१० मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’ने स्वाईन फ्ल्यूची साथ संपल्याचे घोषित केले आहे, तरीही तो तुरळक स्वरूपात अजूनही काही ठिकाणी आढळतो. या रोगाचे विषाणू केवळ एकाच प्रकारचे नाहीत. त्याचे H1N1, H3N2, H1N2, H2N1, H3N1, H2N3 असे एकूण ६ प्रकारचे विषाणू असतात. एका प्रकारच्या विषाणूच्या लसीचा दुसर्या प्रकारच्या विषाणूसाठी उपयोग नसतो. त्यामुळे ‘लस घेतल्यावर सगळे काही आलबेल होते’, हा अपसमज पाळू नये.
डुक्करपालन करणारे शेतकरी या आजाराचे पहिले शिकारी असतात. शेतकरी नसले, तरी डुक्करपालन हा आता स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. तेथील कामगारांना याची लागण होऊ शकते. ज्या गावांमध्ये डुकरांचा सुळसुळाट आहे, त्या गावांमध्येही हा आजार लवकर पसरू शकतो. (मात्र डुकराच्या मांसातून हा आजार पसरत नाही; कारण त्याचे विषाणू जिवंत पेशीतच जिवंत राहून वाढू शकतात.) यासाठी प्रतिबंध म्हणून डुकरांना स्वाईन फ्ल्यूची लस देण्यात येते. डुकरांची शेती करणार्या व्यावसायिकांनी हे काम अवश्य करावे. डुकरांच्या सान्निध्यात काम करणार्या व्यक्तींनी हातमोजे, मास्क वापरून काम झाल्यावर योग्य ती स्वच्छता करणेही अत्यंत आवश्यक आहे.
‘स्वच्छ भारत’ अभियानाचा ‘आरोग्य’ हा एक मूलभूत पाया आहे. आपण त्याविषयी किती गंभीर आहोत, हे महत्त्वाचे आहे !’
– वैद्या सुचित्रा कुलकर्णी (साभार : ‘साप्ताहिक विवेक’)