गणपति विशेष गाड्यां’साठी ३० टक्के अधिक भाडे आकारल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त !

मुंबई – रेल्वे प्रशासनाने कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी २६६ ‘गणपति विशेष गाड्या’ सोडण्याचे घोषित केले आहे. यातील काही गाड्यांसाठीच्या भाड्यात ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर मध्य आणि पश्चिम रेल्वे यांच्या मिळून २६६ विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यांचा तिकीट दर ३० टक्के अधिक असणार आहे. २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरपर्यंतच्या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. परतीच्या ३ ते १० सप्टेंबर या कालावधीतील गाड्यांचेही आरक्षण पूर्ण झाले आहे.

‘गणपति विशेष’ असलेल्या काही गाड्यांना रेल्वेने विशेष भाडे ठेवले आहे. यामध्ये ‘मुंबई सेंट्रल ते ठोकूर’, ‘मुंबई सेंट्रल ते मडगाव’, ‘वांद्रे ते कुडाळ’, ‘उधना ते मडगाव’, ‘कुडाळ ते अहमदाबाद’ या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांचे आरक्षण १८ जुलै या दिवशीच पूर्ण झाले. कोकण रेल्वेच्या नियमित ‘कोकणकन्या’, ‘मांडवी’, ‘तुतारी’, ‘मँगलोर एक्सप्रेस’ आदी गाड्यांना मुंबई ते कणकवलीपर्यंतच्या ‘स्लीपर’ श्रेणीतील प्रवासासाठी आधी ३४० रुपयांची तिकीट आकारणी होती. विशेष भाडे असलेल्या गाड्यांना मुंबई ते कणकवली या ‘स्लीपर’ श्रेणीतील प्रवासासाठी ४३० रुपये मोजावे लागणार आहेत. (हिंदूंच्या सणांच्या वेळी भाडे वाढवणारे सरकार निधर्मी म्हणायचे का ? – संपादक)