कोल्हापूर, ८ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रमात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पुणे विभागाच्या अंतर्गत राज्य संरक्षित/ असंरक्षित स्मारकांचे सुशोभिकरण, तसेच स्वच्छता मोहीम, जनजागृती, ऐतिहासिक वारसा अन् स्थळदर्शन मोहीम राबवण्याचे नियोजन आहे. या अंतर्गत ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलना’स पावनगडाच्या ढासळलेल्या बुरुजाचे दगड सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या मोहिमेस पुरातत्व विभागाने लेखी अनुमती दिली आहे. तसे पत्र ‘शिवदुर्ग संवर्धन आंदोलना’चे श्री. हर्षल सुर्वे यांना पुणे येथील साहाय्यक संचालक यांनी पाठवले आहे.
या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. हर्षल सुर्वे म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत पावनगडावरील बुरुजावरील निखळलेले शिवकालीन दगड एकत्र करून ते बाजूला करून स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. हे दगड १०० ते १५० किलो वजनाचे असून त्यासाठी क्रेनची आवश्यकता आहे. पाऊस अल्प होताच आम्ही गडावर काम चालू करणार आहोत. तेथील प्राचीन मंदिरांचेही संवर्धन करण्याचा संकल्प आहे. ’’