मुसलमानांची ‘मक्का’ आणि ‘मदिना’ यांसारखी पवित्र शहरे स्थित असल्याने सौदी अरेबियाला ‘इस्लामचा बालेकिल्ला’ म्हटले जाते. प्रतिवर्षी लाखो मुसलमान हज यात्रेसाठी सौदी अरेबियात जातात आणि आयुष्य सार्थकी लागल्याचे समजतात; पण नुकतेच सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झालेल्या उत्खननात ८ सहस्र वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले असून त्यातून तिथे हिंदु संस्कृती नांदत असल्याचे दिसून येते.
१. ‘अल-फॉ’ येथे केलेल्या खोदकामात प्राचीन मंदिर आणि यज्ञवेदी यांचे अवशेष सापडणे
देशातील जनतेला आपल्या पुरातन वारसाची माहिती व्हावी; म्हणून पुरातत्व तज्ञांनी सौदी अरेबियाला सर्वेक्षण आणि खोदकाम चालू केलेले आहे. ‘सौदी अरेबिया वारसा आयोगा’तील पुरातत्व तज्ञांना सौदी अरेबियाच्या दक्षिण-पश्चिम भागातील ‘अल-फॉ’ या ठिकाणी केलेल्या खोदकामात तब्बल ८ सहस्र वर्षांपूर्वीचे मंदिर आणि यज्ञवेदी यांचा शोध लागला आहे. या प्राचीन मंदिराचे नाव ‘रॉक-कट’ असे सांगितले जात असून ते माऊंट तुर्वाईकच्या जवळ आहे. विशेष म्हणजे हिंदूंच्या यज्ञवेदी ज्या दिशेला तोंड करून असतात, त्याच दिशेला अल-फॉ या ठिकाणी सापडलेल्या यज्ञवेदीचे तोंड आहे. या व्यतिरिक्त देवतांची चित्रे कोरलेले अनेक अवशेषही या ठिकाणी आढळले आहेत.
२. पुरातत्व तज्ञांनी अहवालात मानवी वस्ती, मंदिर, यज्ञवेदी आणि सिंचन व्यवस्था यांविषयीची माहिती देणे
याचसमवेत ‘या ठिकाणी मानवी वस्तीच्या अवशेषांसह २ सहस्र ८०७ थडग्यांचाही शोध लागला आहे. ही थडगी एकाच काळातील नसून वेगवेगळ्या काळात बांधलेली आहेत. त्यावरून तिथे एकेकाळी मानवी वस्ती असल्याचे समजते, तर मंदिर आणि यज्ञवेदी हिंदु संस्कृतीची पुष्टी करतात’, असे पुरातत्व तज्ञांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. उत्खननात सापडलेले धार्मिक शिलालेख तत्कालीन लोकांना धर्माची किती समज होती, हेही सांगतात.
या अहवालानुसार तत्कालीन व्यवस्थेत जटील सिंचन व्यवस्था होती. कालवे, पाण्याचे तलाव या व्यतिरिक्त शेकडो खड्डेही इथे खणलेले होते. त्याद्वारे पावसाचे पाणी शेतात पोचवले जात असे. वाळवंटी भाग असल्याने त्या काळातील लोक पाणी साठवण्यासाठी कठोर कष्ट घेत असत. तत्कालीन लोक केवळ शेतीच करत नव्हते, तर त्यांच्यात संघर्ष, लढायाही होत असत. समोर आलेल्या अवशेषांतून त्याचीही माहिती मिळते. ‘इथे यापुढेही संशोधनाचे काम चालूच राहील, जेणेकरून नवीन माहिती समोर येईल’, असे आयोगाचे म्हणणे आहे.
३. सौदी अरेबियाचे मूर्तीपूजेशी सहस्रो वर्षांपासूनचे नाते ! – इतिहासकारांचा दावा
सौदी अरेबियातच मंदिर आणि यज्ञवेदी यांचे अवशेष आढळल्याने तेथे मूर्तीपूजेवर चर्चा चालू झाली आहे. अर्थात् ही माहिती आता भूमी खोदल्याने बाहेर आली असली, तरी सौदी अरेबियाचे मूर्तीपूजेशी सहस्रो वर्षांपासूनचे नाते असल्याचा दावा अनेक इतिहासकारांनी याआधीच केलेला आहे. इस्लाममध्ये मक्केतील ‘काबा’ या ठिकाणाला पवित्र स्थळ मानले जाते. पहिल्या शतकातील रोमन इतिहासकार द्यौद्रस सलसच्या मते भगवान शिव आणि काबा यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध आहे.
४. रोमन आणि भारतीय इतिहासकार यांनी ‘मक्केमध्ये विशाल शिवलिंग होते’, असे सांगणे
सध्याच्या घडीला गैरमुसलमान व्यक्तीला काबामध्ये जाण्यावर बंदी आहे. हज यात्रेच्या वेळी मुसलमान काबाचे पूजन करतात आणि चुंबन घेतात. अनेक लोक याला भगवान शंकराचे रूप मानतात. ‘आज मक्का ज्या ठिकाणी आहे, त्या जागेवर आधी ‘मक्केश्वर महादेवा’चे मंदिर होते’, असेही म्हटले जाते. ‘याच ठिकाणी काळ्या पाषाणाच्या रूपात विशाल शिवलिंग होते, जे आता खंडित अवस्थेत आहे’, असे रोमन इतिहासकाराने केलेले लिखाण सौदी अरेबियातील मूर्तीपूजेला बळकटी देते.
भारतीय इतिहासकार स्व. पु.ना. ओक यांनीही त्यांच्या पुस्तकात मक्केविषयी लिहिलेले आहे. ‘मक्केमध्ये इस्लाम पोचण्याआधीच तिथे मूर्तीपूजेचा वारसा चालत आलेला होता’, असे त्यांनी लिहिले आहे. ‘एकेकाळी तिथे हिंदु देवतांची मंदिरे होती’, असे त्यांचे म्हणणे आहे.
तथापि मक्केतील ज्या पाषाणाला हिंदु वा काही इतिहासकार भगवान शंकराचे रूप मानतात, तसे इस्लामी अनुयायी मात्र मानत नाहीत. मुसलमानांच्या मते आदम आणि ईव्ह यांच्यासह (पृथ्वीवरील पहिले मानव) मक्केतील पाषाण जन्नतमधून (स्वर्गामधून) मक्केमध्ये आला. आता मात्र सौदी अरेबियातच मंदिर, यज्ञवेदी आणि मूर्तीपूजा यांचे अस्तित्व आढळल्याने हिंदु संस्कृतीचे प्राचीनत्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ५.८.२०२२)