भंडारा येथील महिलेवर अत्याचार केल्याचे प्रकरण मुख्य आरोपी पसार !
भंडारा – राज्याला हादरवून टाकणार्या भंडारा येथील महिलेवरील अत्याचार प्रकरणात आतापर्यंत २ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी अद्याप पसार आहे. अत्याचार झाल्यानंतर पीडिता लाखणी येथील पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आली होती; पण तिच्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. या प्रकरणी दोषी धरून पोलीस उपनिरीक्षक दिलीप घरडे आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लखन उईके यांना निलंबित करण्यात आले आहे, तर महिला पोलीस खोब्रागडे यांचे भंडारा मुख्यालयाच्या ठिकाणी स्थानांतर करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी ही कारवाई केली.
लाखणी पोलीस ठाण्यात पीडित महिला आली होती ! – संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक
पीडिता ३१ जुलैच्या सायंकाळी मुरमाडी गावाजवळ महिला पोलीस पाटील यांना दिसली होती. त्यानंतर त्या पोलीस पाटील यांनी ११२ क्रमांकावर संपर्क करून लाखनी पोलीस ठाण्यातील ११२ क्रमांकाची गाडी तिथे पाठवली होती. त्या गाडीतून पीडितेला लाखनी पोलीस ठाण्यात रात्री आणण्यात आले होते. ३१ जुलैच्या रात्री पीडिता पोलीस ठाण्यात होती आणि १ ऑगस्ट या दिवशी सकाळी ती निघून गेली’’, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
भंडारा प्रकरणात राजकारण होत असल्याचा आरोप !
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी पीडिता उपचार घेत असलेल्या रुग्णालयाला भेट दिली. या प्रकरणात राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पीडितेला साहाय्य करण्यात यावे, तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा’, अशी मागणी त्यांनी केली.
संपादकीय भूमिका‘उत्तरदायी पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !’ गुन्हेगारांवर कारवाई न करणार्या कर्तव्यचुकार पोलीस अधिकार्यांचे केवळ निलंबन किंवा स्थानांतर करून उपयोग होणार नाही, त्यापेक्षा त्यांना बडतर्फच करायला हवे ! |