पैसे घेऊनही म्हाडाची सदनिका न दिल्याने बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – लाभार्थ्यांना म्हाडा अंतर्गत सदनिका देण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये घेऊनही त्यांना मुदतीमध्ये सदनिका न देता लाभार्थी, म्हाडा आणि शासन यांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पंकज येवला (वय ३५ वर्षे) असे गुन्हा नोंद झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय ठाकूर यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (अशा भ्रष्ट बांधकाम व्यावसायिकाची बांधकाम करण्याची अनुमतीच रहित करायला हवी, तरच असे प्रकार थांबतील. – संपादक) बांधकाम व्यावसायिकास त्याचा बांधकाम प्रकल्प पूर्ण होणार नाही, याची निश्चिती असतांनाही त्याने १५ लाभार्त्यांकडून दोन ते अडीच कोटी रुपये इतकी रक्कम घेऊन फसवणूक केली.