मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी !

सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील ‘हुतात्मा अशोक कामटे’ संघटनेची मागणी

सांगोला (जिल्हा सोलापूर) – मागील ३ वर्षांपासून बंद असलेली ‘मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी’, या मागणीचे निवेदन ‘हुतात्मा अशोक कामटे’ या बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वे विभाग, सोलापूर यांना देण्यात आले. मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज ही गाडी मागील ३ वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आली होती.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सर्व विभागांत रेल्वे चालू करण्यात येत असतांना सोलापूर विभागात अनेक रेल्वेगाड्या चालू करण्यात आलेल्या नाहीत. त्यातील मिरज-परळी ही रेल्वे कुर्डूवाडी, बार्शी, धाराशिव, येडशी, लातूर आणि मराठवाडा यांना जोडणारी उपयुक्त रेल्वे आहे. महाराष्ट्र शासनाने यापुढील काळात गणेशोत्सव, दहीहंडी यांसारखे उत्सव निर्बंधमुक्त केले आहेत. ‘श्रावण मासामध्ये श्री क्षेत्र परळी वैद्यनाथ गाडी चालू करून भाविक भक्तांची होणारी गैरसोय दूर करावी’, अशी अनेक प्रवाशांनी कामटे संघटनेकडे मागणी केली आहे. याची नोंद घेऊन हे निवेदन देण्यात आले.