साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यासाठी चैतन्यमय वाणीतून तळमळीने मार्गदर्शन करणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

१. युवा साधकांच्या मनात साधना करण्याचा उत्साह निर्माण करणारा सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेला चैतन्यमयी सत्संग !

श्री. ज्ञानदीप चोरमले

१ अ. सद्गुरु स्वाती खाडये यांचे बोलणे साधकांच्या अंतर्मनापर्यंत जात असणे आणि त्यांना व्यष्टी अन् समष्टी साधना करण्यासाठी चैतन्य मिळणे : ‘सद्गुरु  स्वाती खाडये प्रत्येक आठवड्याला युवा साधकांसाठी सत्संग घेतात. त्या सत्संगात युवा साधकांकडून आठवड्यात झालेले साधनेचे प्रयत्न जाणून घेतात. त्या ‘पुढील आठवड्यात कसे प्रयत्न करायचे ?’, याविषयी युवा साधकांना दिशा देतात. त्या ‘साधकांनी आणखी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे ?’, हेही सांगतात. त्यांचे बोलणे ऐकून साधकांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. त्यांचे बोलणे साधकांच्या अंतर्मनापर्यंत जाते आणि त्यातून त्यांना आठवडाभर प्रयत्न करण्यासाठी चैतन्य मिळते. त्यांच्या मार्गदर्शनानंतर अनेक युवा साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेत वृद्धी झाल्याचे लक्षात आले.

१ आ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्यातील तळमळीमुळे युवा साधकांचे प्रयत्न चांगले होत असणे : गुरुकृपेने मलाही त्या सत्संगाला बसण्याची संधी मिळाली. सद्गुरु स्वातीताई सांगत असलेली साधनेची सूत्रे सध्याच्या काळात पुष्कळ आवश्यक आहेत. त्या पुष्कळ तळमळीने सूत्रे सांगतात. त्यामुळे साधकांच्या मनात ते प्रयत्न करण्याविषयी आपोआप उत्साह निर्माण होतो. सद्गुरु ताईंच्या चैतन्यमय वाणीतून युवा साधकांना मार्गदर्शन मिळत असल्याने त्यांचे प्रयत्न चांगले होत आहेत.

२. साधकांना सद्गुरु स्वातीताईंचे पुष्कळ साहाय्य होणे आणि त्यांचा आधार वाटणे

सद्गुरु ताई अनेक वेळा ठिकठिकाणच्या साधकांना मार्गदर्शन करतात.  त्यांच्या प्रत्येक मार्गदर्शनानंतर ‘साधकांच्या प्रयत्नांमध्ये वृद्धी होते’, असे लक्षात आले. त्या ‘साधकांच्या साधनेसाठी काय आवश्यक आहे ?’, हे जाणतात आणि त्यानुसार त्या साधकांना मार्गदर्शन करतात. त्यांचे साधकांना पुष्कळ साहाय्य होते आणि त्यांचा आधार वाटतो.

असे समष्टी सद्गुरु घडवणारे विष्णुस्वरूप गुरुदेव आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. ज्ञानदीप चोरमले (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १९ वर्षे), सोलापूर (२५.१२.२०२१)