इतिहासाच्या विकृतीकरणाला शास्त्रशुद्ध मांडणीतून वैचारिक उत्तर देणे आवश्यक ! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी स्मृतीग्रंथ ‘सोनचाफा’चा प्रकाशन सोहळा

अविनाश धर्माधिकारी

पुणे – भारताच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा उद्योग स्वातंत्र्यपूर्व काळातही चालूच होता. आधी वसाहतवादी इतिहासकारांनी आणि स्वातंत्र्योत्तर काळात मार्क्सवादी इतिहासकारांनी तो केला. त्यांना दस्तावेज, पुरावे, भाषा आणि उत्खनन शास्त्राच्या आधारे शास्त्रशुद्ध मांडणीतून वैचारिक उत्तर देणे आवश्यक आहे, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

ते ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेल्या ‘सोनचाफा’ या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी स्मृतीग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या वेळी मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर, इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे, स्मृतीग्रंथाच्या अतिथी संपादक डॉ. चित्रलेखा पुरंदरे आदी उपस्थित होत्या.

गजानन मेहेंदळे म्हणाले की, पाठ्यपुस्तकातील इतिहास हा सरकारी धोरणानुसार शिकवण्यात येतो. खर्‍या इतिहासाचा शोध घेण्यासाठी फारसी भाषेतील मूळ साधनांपर्यंत जाणे आवश्यक आहे. उत्तम इतिहास संशोधन करणे हीच बाबासाहेब पुरंदरे यांना खरी श्रद्धांजली होईल.