वर्ष २००१ मध्ये ११ सप्टेंबरला (९/११) ३ सहस्रांहून अधिक अमेरिकी नागरिकांचे बळी घेणार्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या ‘ट्वीन टॉवर’वरील आतंकवादी आक्रमणाचा सूड अमेरिकेने अंतिमतः १ ऑगस्ट २०२२ या दिवशी घेतला. या आक्रमणाचा सूत्रधार (मास्टरमाईंड), तसेच या आक्रमणाला कारणीभूत असणार्या अल्-कायदा या संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन याचा उजवा हात आणि त्याच्यानंतर या संघटनेचा सर्वेसर्वा झालेला आयमन अल् जवाहिरी याला अमेरिकेने ‘ड्रोन’च्या माध्यमातून क्षेपणास्त्र (मिसाईल) आक्रमण करून संपवले.
इजिप्तमधील श्रीमंत कुटुंबातील नेत्रचिकित्सक आणि अरब राष्ट्रांमधील सरकारे पालटणार्या सुन्नी इस्लामिक विचारांचे पुनरुज्जीवन करण्याच्या कामात असलेला जवाहिरी हा लादेन याला जाऊन मिळाला अन् त्याने स्वतःचा आतंकवादी गट अल्-कायदामध्ये विलीन केला. इजिप्तमध्ये भूमीगत राहून आणि गुप्तचर यंत्रणांना चकवा देत अल् जवाहिरी अल्-कायदामध्ये आतंकवाद्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षित करत होता. त्याने भारतासह बाली, मोम्बासा, रियाध, जकार्ता, इस्तंबूल, लंडन यांसह जगभरात अनेक ठिकाणी आतंकवादी आक्रमणे केली; इतकेच नव्हे, तर अमेरिकेशी संबंधित विविध ठिकाणी झालेल्या लहान-मोठ्या आतंकवादी आक्रमणांत त्याचा हात होता. अमेरिकेचे जहाज उडवून त्याने १७ नौसैनिकांचा बळी घेतला होता, तर केनिया आणि टांझानिया येथील अमेरिकी दूतावासांवर आक्रमण करून काहींचे बळी घेतले होते. ‘९/११’ च्या आक्रमणासाठी त्याने आत्मघातकी आक्रमणकर्त्यांना एकत्र आणून निधीही जमवला होता. जगातील क्रमांक एकच्या आणि गेली २१ वर्षे अमेरिकेला हव्या असलेल्या या आतंकवाद्याला यापूर्वीही २ वेळा मारण्याचा प्रयत्न झाला होता. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात १० वर्षे होते. सैन्य मागे घेतांना अमेरिका-अफगाणिस्तान यांच्यात काही करारही झाले होते, तरीही शत्रूला नेस्तनाबूत करण्याच्या तीव्र कणखर भूमिकेमुळे अमेरिकेने त्यांच्यावरील आक्रमणाच्या सूत्रधाराचा बळी शेवटी घेतलाच ! अफगाणिस्तानचे गृहमंत्री हक्कानी यांच्या काबूल येथील घरात त्याला जागा दिली असल्यामुळे ‘आतंकवादाला पोसणार नाही’, या त्यांच्या अटीचे त्यांनी सरळ उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अमेरिकेने आक्रमणाच्या संदर्भातील केलेल्या कराराच्या उल्लंघनाविषयी अफगाणिस्तान आता काही बोलू शकणार नाही. विशेष म्हणजे पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ची सुरक्षा जवाहिरीला होती. त्यामुळे पाकचाही यात हात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘लक्ष्य दिसल्यावर ‘हेच अचूक लक्ष्य आहे’, हे ड्रोनमधील संबंधित छायाचित्राशी संलग्न असलेल्या यंत्रणेला कळते आणि घातक ६ धारदार ब्लेड असलेले ‘हेलफायर’ क्षेपणास्त्र अचूकपणे तिथे डागले जाते’, अशा स्वरूपाची वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा असलेले क्षेपणास्त्र अमेरिकेने अफगाणिस्तानसारख्या प्रदेशात आक्रमण करण्यासाठी बनवलेले आहे. हिंद महासागरात असलेल्या विमानवाहू नौकेवरून ड्रोन सोडून लक्ष्याच्या जवळ गेल्यावर हे क्षेपणास्त्र डागण्यात आले आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर सहस्रो कि.मी. दूर असलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करण्यात आले.
भारताचेही कणखर धोरण आवश्यक !
अमेरिका आणि भारत यांच्यात ३ संरक्षण करार झाले आहेत. त्यानुसार भारताच्या गुप्तहेर संघटनेने अमेरिकेला आणि अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेने भारताला माहिती देण्याच्या संदर्भातील एक करार आहे. भारत हा पाक आणि अफगाण यांच्या सीमांना जोडलेला आहे. त्यामुळे त्या आधारे भारताने पुरवलेली स्थानिक गुप्त माहिती आणि अमेरिकेकडील उच्च तंत्रज्ञान यांच्या साहाय्याने हे लक्ष्य गाठले गेल्याचे सैन्यातील एका निवृत्त अधिकार्याने म्हटले आहे. अमेरिकेप्रमाणेच भारतातील अनेक स्तरांवरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आतंकवादी कारवायांच्या पाठीमागे जवाहिरी याचा हात असल्याने भारतासाठीसुद्धा ही घटना महत्त्वाची आहे. नूपुर शर्मा प्रकरणात भारतातील वातावरण बिघडवण्यामागे अल्-कायदाचा मोठा हात आहे. त्यानंतर झालेल्या हिंदूंच्या हत्यांमागेही या संघटनेचे लोक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या घटनेनंतर भाजपचे नेते रवि किशन यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. ते म्हणाले, ‘‘भारतात आतंकवादी कारवाया चालू ठेवणारे ‘स्लिपर सेल’ कार्यरत आहेत. भारतात असे कित्येक अल्-जवाहिरी लपले आहेत. या किड्यांना वेचून वेचून मारले पाहिजे. ते आपल्यामागे सहस्रो आतंकवादी निर्माण करून ठेवतात.’’ त्यांनी ‘आतंकवाद्यांना शोधून मारले पाहिजे’, या सूत्रावर भर दिला. कदाचित् निधर्म्यांना हे विधान रुचणार नाही आणि ते त्यावर प्रतिक्रिया देणेही चालू करतील; परंतु ‘आतंकवाद हा संपवावाच लागतो’, हे एक सत्य विधान आहे. जगभराप्रमाणेच भारतातही या आतंकवाद्यांना होणारे अर्थ आणि शस्त्र यांच्या पुरवठ्याचे स्रोत, त्यांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिली जाणारी ठिकाणे, त्यांचे मनःपरिवर्तन करणारी शैक्षणिक क्षेत्रापासूनची अनेक ठिकाणे, आतंकवाद्यांना सर्वांगाने साहाय्यभूत ठरलेली सामाजिक प्रसारमाध्यमे आदी सर्व माध्यमांतून आतंकवाद्यांना मिळणारे साहाय्य बंद कसे होईल, हे तर पाहिले पाहिजेच; परंतु त्याचसमवेत काही वेळा अधिक कठोर कारवाईही अपेक्षित आहे. २ ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून भारताने स्वतःचे सामर्थ्य दाखवून दिले आहे, तरी अद्यापही काश्मीरमध्ये प्रतिदिन होणारी आतंकवाद्यांची घुसखोरी आणि सामान्यांच्या हत्या पहाता ‘अधिक कठोर कारवाई अपेक्षित आहे’, असे वाटते. ‘२६/११’चा (मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी झालेले आतंकवादी आक्रमण) सूत्रधार हाफिज सईद असेल किंवा दाऊद हे अद्याप मोकाट आहेत. ‘अमेरिका तिच्यावरील आक्रमणाचा सूड घेतोच’, असे त्यांचे अध्यक्ष जो बायडन यांनी अभिमानाने सांगितले. भारतभर धर्मांधांच्या विविध छोट्या-मोठ्या घटना आणि आक्रमणे यांतून प्रतिदिन समोर येत असलेली आतंकवादाची धास्ती कायमची संपायला हवी. त्यादृष्टीने ‘भारतानेही आतंकवाद्यांचे मूळ स्रोत असलेल्या संघटनांची पाळेमुळे तोडण्यासाठी अशीच कणखर भूमिका घेणे अपेक्षित आहे’, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !
शत्रूचा समूळ नायनाट होईपर्यंत कार्यरत असणार्या अमेरिकेचे भारतानेही अनुकरण करावे ! |