संभाजीनगर – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने केलेली कारवाई आणि केंद्र सरकार यांच्या निषेधार्थ शहरात १ ऑगस्ट या दिवशी शिवसेनेच्या वतीने क्रांती चौक येथे निदर्शने करण्यात आली. आगामी काळात ‘ईडी’च्या विरोधात आरपारची लढाई लढू, अशी चेतावणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या वेळी दिली. या वेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
पत्रकारांशी बोलतांना चंद्रकात खैरे म्हणाले की, केंद्र सरकार राजकीय आणीबाणी निर्माण करत आहे. आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी ‘ईडी’चा वापर करत आहे. आम्ही ‘ईडी’ला घाबरणार नाही. आगामी काळात यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून उत्तर देऊ. ‘ईडी’वाल्यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे, तसेच बंडखोर आमदार गुजरात आणि गुवाहाटी या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांचा व्यय कोणी केला ?, याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. नागपूर, यवतमाळ, लातूर येथेही शिवसैनिकांनी निदर्शने केली.