परमाणू शस्त्रास्त्रे बनवण्याची इराणची क्षमता असली, तरी तसे नियोजन नाही ! – इराण

परमाणू शस्त्रास्त्रे बनवण्याची इराणची क्षमता

तेहरान (इराण) – परमाणू शस्त्रास्त्रे बनवण्याची इराणची क्षमता असली, तरी तसे नियोजन नाही, अशी माहिती इराणचे अणूऊर्जा कार्यक्रमाचे प्रमुख महंमद इश्लामी यांनी दिली. ‘इराणचा परमाणू कार्यक्रम हा केवळ नागरिकांच्या सुविधेसाठी आहे’, असेही ते म्हणाले. असे असले, तरी पाश्चात्त्य देशांना इराणच्या या दाव्यावर विश्वास नाही.

१. इराणच्या परमाणू कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणारा करार वर्ष २०१५ मध्ये संपुष्टात आल्यापासून इराणने स्वत:ची क्षमता गतीने वाढवण्यास आरंभ केला. त्यामुळेच अमेरिका, जर्मनी आदी राष्ट्रांतील संरक्षण अधिकार्‍यांनी वेळ हातातून निघून जायच्या आधीच करार पुन्हा करणे आवश्यक असल्याचे वेळोवेळी म्हटले आहे.

२. इराणच्या अध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार कमाल कराज्जी यांनीही काही दिवसांपूर्वी, ‘परमाणू बाँब बनवण्याची इराणकडे तांत्रिक क्षमता असली, तरी ते आमच्या कार्यसूचीत (‘अजेंड्या’वर) नाही’, असे वक्तव्य केले होते.

३. अमेरिकन अधिकार्‍यांनुसार इराणने परमाणु कार्यक्रमात वृद्धी करणे चालू ठेवले, तर एका वर्षाच्या आत त्याच्याकडे परमाणू बाँब बनवण्यासाठी पुरेसे युरेनियम असेल.