नागपंचमी सण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच साजरा करा ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली – कोरोना महामारीच्या कालावधीनंतर नागपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. हा सण साजरा करतांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच नागपंचमी सणाचे आयोजन होईल, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे. ज्या ठिकाणी आवश्यकता वाटेल, तेथे जिल्हा प्रशासनाचे तातडीने साहाय्य घ्यावे, असे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नागपंचमी सणाच्या आयोजनाविषयी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी उपवनसंरक्षक नीता कट्टे, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, अंबामाता मंदिराचे अध्यक्ष संभाजी गायकवाड यांसह अन्य उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, ‘‘नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने १२५ अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची नियुक्ती केली असून यात १० पहारा पथके सिद्ध केली आहेत. शिराळा नगरपंचायतीतील ३२ गल्ल्यांमध्ये पथकाचे लक्ष असणार आहे. पोलीस विभागाच्या माध्यमातून ५०० अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस विभागाकडून १६ व्हिडिओ कॅमेरांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून ध्वनीमर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी १२ ध्वनीमापक यंत्रे तैनात ठेवण्यात येणार आहेत.’’ (अन्य धर्मियांचे अनेक सण वर्षभर साजरे होतात. तेव्हा प्रत्येक वेळी पोलीस प्रशासनाने इतके व्हिडिओ कॅमेरे, ध्वनीमापक यंत्रे, तसेच पहारा पथके तैनात केल्याचे ऐकीवात नाही ! हिंदूबहुल देशात हिंदूंनाच त्यांचे सण कायम प्रशासनाच्या दबावाखालीच साजरे करावे लागणे दुर्दैवी ! – संपादक)