सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध देवतांचे वस्त्रालंकार परिधान करण्याच्या संदर्भात लक्षात आलेली गुरुतत्त्वाची महती !

गुरुपौर्णिमेच्या (१३.७.२०२२ या) दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्री दत्तात्रेय रूपातील वस्त्रालंकार परिधान केले होते. यामुळे काही साधक किंवा सनातन संस्थेचे हितचिंतक यांना प्रश्न पडू शकतो की, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या गेल्या काही जन्मोत्सवांच्या वेळीही त्यांनी श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीविष्णु यांचे वस्त्रालंकार परिधान केले होते. प्रत्येक रूपाच्या वेळी त्या-त्या तत्त्वाच्या अनुभूती साधकांना आल्या. मग परात्पर गुरु डॉक्टर नेमके कुणाचे अवतार आहेत ? त्यांच्यात नेमके कोणते तत्त्व आहे ? या संदर्भात सुचलेली उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.

श्रीविष्णूच्या रुपातील सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. आठवले

१. साधक किंवा शिष्य यांच्यासाठी त्यांचे गुरु हेच त्यांचे सर्वस्व असतात. त्यामुळे ‘माझे गुरु कुणाचे अवतार आहेत, त्यांच्यात कोणते तत्त्व आहे किंवा नाही’, हे विषय गौण असतात. त्याचप्रमाणे ज्या साधकाचा जसा भाव असेल, त्या रूपात गुरुतत्त्व, म्हणजेच ईश्वरी तत्त्व त्याला दर्शन देत असते. उदा. एखादा साधक शिवाची उपासना करत असेल, तर त्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या माध्यमातून शिवतत्त्वाच्या अधिक अनुभूती येऊ शकतात. या प्रकारच्या अनेक अनुभूती, कथा आपण पुराणांमधून, संतचरित्रांमधून वाचल्या आहेत.

श्री. सागर निंबाळकर

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘सर्व साधकांना एकच साधना न सांगता, त्या साधकजिवाला आवश्यक साधनामार्गानुसार साधना सांगितली’, हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. त्याला अनुसरून साधकांची श्रद्धा अधिकाधिक वृद्धींगत व्हावी आणि सर्व साधकांना त्यांच्या साधनामार्गाला आवश्यक असलेले ईश्वरी तत्त्व मिळावे, यासाठी सप्तर्षी निरनिराळ्या देवतांचे वस्त्रालंकार घालण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना सांगतात.

३. वयाच्या ७३ व्या वर्षापर्यंत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करून घेतला नव्हता; मात्र साधकांच्या मनात ‘माझ्या इष्टदेवतेच्या रूपात माझ्या गुरूंना पहाता यावे’, अशा सुप्त इच्छा होत्या. सर्व साधकांच्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सप्तर्षीच साधकांच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना काय करायचे, ते सांगतात.

४. या सर्व रूपांचा एकत्रित विचार केला असता, असे शिकायला मिळते की, गुरुतत्त्व हेच सर्वसमावेशक ईश्वरी तत्त्व असून तेच साधक आणि शिष्य यांच्यासाठी पुरेसे आहे. एकदा गुरूंची कृपा झाली की, सर्व देवतांची कृपा झालेलीच असते. आजही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी विविध देवतांना प्रसन्न करून घेतल्यामुळेच साधकांवरही त्या देवतांची कृपा होत आहे, याच्या अनुभूती शेकडो साधकांनी घेतलेल्या आहेत.

त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची विविध देवतांच्या वस्त्रालंकारातील रूपे ही भगवंताची लीलाच आहे, हे समजून घेऊन साधकांनी त्या सोहळ्यातील, त्या गुरुरूपातील आनंद अधिकाधिक लुटला पाहिजे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर, आम्ही साधक खरंच भाग्यवान आहोत की, ही सर्व देवतांची रूपे आम्हाला आपल्या रूपात पहायला मिळत आहेत. आम्ही इतके भाग्यवान आहोत की, भगवंत आम्हांसारख्या अतिसामान्य साधकांसाठी एवढे सर्व घडवतो. खरं तर ही सर्व आपलीच कृपा असून या कृपेविषयी आम्ही आजन्म कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे.

कोटीश: कृतज्ञता गुरुदेव !!

– श्री. सागर निंबाळकर (वय ४३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२२)