विदर्भातील साधकांना सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. मंदा भालतीलक, अकोला
१ अ. पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेल्या नामजपादी उपायामुळे मुलीचे पित्ताशयाचे शस्त्रकर्म टळणे
१ अ १. मुलीच्या पित्ताशयात खडे होऊन तिला पुष्कळ वेदना होणे आणि वेदनाशामक इंजेक्शन्स घेऊनही दुखणे न्यून न होणे : ‘मी मागील १३ वर्षांपासून साधना करते. एकदा माझी मुलगी सौ. कविता हिच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. तिला आधुनिक वैद्यांकडे नेल्यावर तिच्या पित्ताशयात खडे झाल्याचे निदान झाले. तिचे हे दुखणे इतके भयंकर होते की, ४ इंजेक्शन्स देऊनही सलग ८ घंटे तिच्या पोटात दुखत होते. यावर उपचार करण्यासाठी आम्ही १० आधुनिक वैद्यांचे मार्गदर्शन घेतले. त्या सर्वांनी ‘पित्ताशयाचे शस्त्रकर्म करणे’, हाच उपाय असल्याचे आम्हाला सांगितले. मुलीला तीव्र वेदना होत होत्या.
१ अ २. साधिकेने परात्पर गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि पू. पात्रीकरकाका यांनी सांगितलेला नामजप तिच्या मुलीने केल्यावर मुलीच्या वेदना न्यून होणे अन् ३ मासांत तिचे दुखणे पूर्णपणे थांबणे : शेवटी मी प.पू. गुरुमाऊलीला (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) संपूर्णपणे शरण जाऊन प्रार्थना केली, ‘तुम्हीच माझे सर्वस्व आहात. आता आपणच काय ते पहा.’ त्यानंतर मी पू. पात्रीकरकाकांना (पू. अशोक पात्रीकर यांना) मुलीच्या दुखण्याविषयी सांगितले. त्यांनी तिला उपायांसाठी नामजप सांगितला. मुलीने तो नामजप केल्यावर तिच्या वेदनांची तीव्रता न्यून झाली. तिने ३ मास तो जप पूर्ण श्रद्धेने केला. त्यानंतर तिचे दुखणे पूर्णतः थांबले.
१ अ ३. तीन मासांनंतर आधुनिक वैद्यांनी मुलीला पडताळल्यावर त्यांना आश्चर्य वाटणे आणि त्यांनी ‘आता शस्त्रकर्माची आवश्यकता नाही’, असे सांगणे : तीन मासांनंतर मुलीला पुन्हा आधुनिक वैद्यांकडे पडताळणीसाठी नेले. तिला पडताळल्यावर आधुनिक वैद्यांनाही पुष्कळ आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ‘‘आता शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नाही.’’ तेव्हा आम्हाला फार आनंद झाला. जो त्रास लाख रुपये देऊनही न्यून झाला नसता, तो पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेल्या उपायांमुळे केवळ काही मासांमध्येच गेला.
केवळ प.पू. गुरुमाऊली आणि पू. पात्रीकरकाका यांच्यामुळेच माझ्या मुलीचे स्वास्थ्य चांगले राहिले. यासाठी मी गुरुदेव आणि पू. पात्रीकरकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
२. श्री. धीरज राऊत, अकोला
२ अ. वागण्यातील सहजता
१. ‘पू. पात्रीकरकाकांच्या सहज वागण्यामुळे घर आणि व्यवहार या संदर्भातील आर्थिक गोष्टींविषयी मला त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलता येते. त्यामुळे मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते.
२. मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. तो त्रास शब्दांतून सांगता येत नाही; परंतु पू. काकांमधील सहजता, निर्मळता, निरपेक्ष प्रेम आणि व्यापकता या गुणांमुळे मी त्यांना सर्व गोष्टी सहजपणे सांगू शकतो.
२ आ. पू. पात्रीकरकाका यांनी सांगितलेल्या उपायांमुळे झालेले लाभ !
१. मी पू. काकांना भ्रमणभाष करतो, तेव्हा त्यांच्या बोलण्यातील चैतन्यामुळे माझ्यावरील त्रासदायक आवरण न्यून होते. त्यांनी सांगितलेल्या मंत्रजपातून उपाय होऊन माझा त्रास न्यून होतो.
२. मला ‘घरातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि मी तिचे पिंडदान करत आहे’, असे दृश्य सतत एक मास दिसत होते. मी हे पू. काकांना संगितले. त्यावर त्यांनी मला ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करायला संगितला. त्यांनी तो उपाय सांगितलेल्या क्षणापासूनच ‘ते दृश्य दिसणे न्यून झाले’, असे मला जाणवले आणि मी तो उपाय नियमित करू लागल्यावर ते दृश्य दिसणे पूर्णपणे बंद झाले.’
३. सौ. मंगला किशोर पांडे, वानखेड (जि. बुलढाणा)
३ अ. साधकांच्या अडचणी आणि प्रश्न सोडवणे : ‘मी पू. पात्रीकरकाकांशी प्रथमच बोलले. तेव्हा ‘माझी पू. काकांशी फार दिवसांपासून ओळख आहे’, असे मला वाटले. त्यामुळे मला त्यांच्याशी मनमोकळेपणे बोलता आले. त्या वेळी मी मला आलेल्या अडचणी आणि प्रश्नही त्यांना विचारले. त्यांनी मला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन मंत्रजप सांगितले. पू. काकांशी बोलून झाल्यावर मला फार छान वाटले. मला उत्साह जाणवला. ‘संत आपली काळजी घेतात !’, हे माझ्या लक्षात आले.
३ आ. पू. पात्रीकरकाका यांच्याशी बोलल्यावर झालेले लाभ !
३ आ १. पू. पात्रीकरकाकांनी सांगितल्याप्रमाणे यजमानांनी नामजप केल्यावर त्यांच्यात सकारात्मक पालट जाणवणे : मला पू. पात्रीकरकाकांशी दुसर्यांदा भ्रमणभाषवर बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा पू. काका माझ्या यजमानांशीही बोलले. पू. काकांनी यजमानांना नामजप करायला सांगितला. यजमानांनी लगेच नामजप करण्यास आरंभ केला. आता माझ्या यजमानांमध्ये सकारात्मक पालट जाणवत आहे.
३ आ २. पू. पात्रीकरकाकांशी बोलल्याने शारीरिक त्रास न्यून होणे : एक दिवस मला अंगदुखीचा पुष्कळ त्रास होत होता. याविषयी पू. काकांशी बोलल्यानंतर माझा त्रास न्यून झाला. तेव्हा ‘संताच्या बोलण्यामध्ये किती चैतन्य असते ! केवळ त्यांच्याशी बोलल्याने आपले शारीरिक त्रास न्यून होतात’, हे माझ्या लक्षात आले.’
४. सौ. शुभांगी गिरीश कुलकर्णी
४ अ. पू. पात्रीकरकाका यांनी सांगितलेल्या नामजपामुळे ताप बरा होणे : ‘एकदा मी १७ दिवस तापाने फणफणत होते. मला श्वास घ्यायलाही संघर्ष करावा लागत होता. पू. पात्रीकरकाकांनी मला श्री गणपतीचा जप करायला सांगितला. मला तो नामजप फार प्रयत्नपूर्वक करावा लागला; परंतु गुरुमाऊलीची कृपा आणि पू. काकांचा संकल्प यांमुळे मला तो जप चिकाटीने करता आला. त्यामुळे माझा त्रास नाहीसा झाला.’
५. अधिवक्त्या श्रुती भट, अकोला
५ अ. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ असलेले पू. पात्रीकरकाका ! : ‘साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना व्हावी’, अशी पू. पात्रीकरकाकांचीच पुष्कळ तळमळ असते. मध्यंतरी घरगुती अडचणींमुळे माझे साधनेचे कुठलेच प्रयत्न होत नव्हते. पू. काकांनी मला भ्रमणभाष करून माझ्या अडचणी जाणून घेतल्या आणि ‘त्यांवर मात कशी करायची ?’, हे मला अत्यंत प्रेमाने समजावून सांगितले. त्यानंतर माझे साधनेचे प्रयत्न पुन्हा चालू झाले.
५ आ. पू. काकांच्या मार्गदर्शनातून ‘त्यांची समष्टीविषयीची प्रीती आणि व्यापकता पुष्कळ वाढली आहे’, असे जाणवते.’
५ इ. पू. पात्रीकरकाकांच्या बोलण्यातून त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवतो. त्यामुळे साधकांचाही परात्पर गुरु डॉक्टरांविषयीचा कृतज्ञताभाव वाढतो.’
६. सौ. लीला वासुदेवराव मोरे, अकोला
अ. ‘पू. पात्रीकरकाका म्हणजे चैतन्याचा स्रोतच आहेत. ते बोलत असतांना जणू चैतन्याची उधळण होते.
आ. पू. काकांच्या सान्निध्यात मनातील विचार नष्ट होऊन नामजप चालू होतो आणि मन पुष्कळ शांत होऊन आनंद वाटतो.
इ. ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटते.
ई. आम्हाला पू. काकांमध्ये प.पू. गुरुदेवांचेच अस्तित्व जाणवते.
उ. या आपत्काळाच्या स्थितीमध्ये आम्हा साधकांना त्यांच्या मार्गदर्शनाचा पुष्कळच आधार वाटतो आणि साधना करण्यासाठी बळ मिळते. त्यांची नुसती आठवण काढली, तरी भाव जागृत होतो.’
७. सौ. स्नेहल नीलेश खांदेल, अकोला
७ अ. पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेल्या मंत्रजपाने पेशीपेशीत ऊर्जा निर्माण होऊन पाठदुखीचा त्रास नाहीसा होणे : ‘पूर्वी मला पाठदुखीचा पुष्कळ त्रास होत होता. त्यावर पू. पात्रीकरकाकांनी मला मंत्रजप सांगितला. तो मंत्रजप करत बनवलेले तीर्थ पीत असतांना ‘ते तीर्थ माझ्या पेशीपेशीत जात असून शरिरात ऊर्जा निर्माण हाेत आहे’, असे मला जाणवत होते. पंधरा दिवस औषधे घेऊनही न्यून न झालेली माझी पाठदुखी मंत्रजपाने १५ दिवसांतच बरी झाली. ‘संतांचे केवळ चैतन्यदायी बोलणे आणि त्यांनी सांगितलेला मंत्रजप यांमुळे कितीतरी लाभ होतो’, हे मला शिकायला मिळाले.
७ आ. पू. पात्रीकरकाकांनी सांगितलेल्या मंत्रजपामुळे २ दिवसांत मूत्र-संसर्गाचा त्रास न्यून होऊन थकवा नाहीसा होणे : दहा दिवसांपूर्वी माझी प्रकृती ठीक नव्हती. आधुनिक वैद्यांनी मूत्र-संसर्ग (‘युरिन-इन्फेक्शन’) झाला आहे’, असे निदान केले. मला फार थकवा असल्यामुळे घरातील कामे वेळेत होत नव्हती. माझी चिडचिडही वाढली होती. मला या सर्वांचा ताण येत होता. पू. पात्रीकरकाकांशी दूरभाषवर बोलण्यास आरंभ केल्यावर मला चैतन्य मिळून उत्साह वाटू लागला. पू. काकांनी मला होणार्या त्रासासाठी मंत्रजप सांगितला. मी तो मंत्रजप चिकाटीने आणि नियमित केल्यामुळे २ दिवसांतच मला होणारा त्रास न्यून झाला अन् थकवा नाहीसा झाला.’
८. सौ. मेघा जोशी
८ अ. पू. पात्रीकरकाकांच्या चैतन्यामुळे दैनिक वितरण करणार्या साधकांमध्ये सकारात्मक पालट होऊन त्यांच्या अडचणी त्वरित सुटणे : ‘पू. पात्रीकरकाकांना घरगुती किंवा प्रसारातील कुठल्याही अडचणी संगितल्यावर ते त्यांवर लगेच उपाय सुचवतात. त्या उपायांनी अडचणीही लगेच सुटतात. मध्यंतरी दैनिक वितरण सेवेत पुष्कळ अडचणी येत होत्या. ‘दैनिक वितरण बंद होते कि काय ?’, असे मला वाटू लागले. मी ही अडचण पू. काकांना सांगितल्यावर ते वितरण करणार्या साधकांशी बोलले. त्यानंतर वितरण करणार्या साधकांमध्ये सकारात्मक पालट झाला. त्यामुळे अडचणी अगदी सहजतेने सुटल्या.’
९. श्री. श्याम राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), अकोला
९ अ. सहजता, आपुलकी आणि प्रीती या गुणांमुळे पू. पात्रीकरकाकांनी जुन्या साधकांशी जवळीक साधून त्यांच्यासाठी सत्संग चालू करणे अन् पू. काकांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकणे : ‘एक वर्षापूर्वी पू. काकांनी जुन्या साधकांची सूची करायला सांगितली. नंतर त्यांनी या साधकांशी दूरभाषवर संपर्क साधून त्यांचा एक सत्संग आयोजित केला. पू. काकांच्या मार्गदर्शनाने त्या साधकांना योग्य दिशा मिळाली आणि ते पुन्हा साधनेशी जोडले गेले. त्यांच्या मनात इतर साधकांविषयी विकल्प निर्माण झाले होते. ते दूर होऊन आता त्यांची सर्वांशी जवळीक निर्माण झाली आहे. त्या सत्संगात बरेच साधक स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया शिकून घेत आहेत. पू. काकांमधील सहजता, आपुलकी आणि प्रीती यांमुळे हे घडले.
९ आ. ‘सर्व साधक माझ्या गुरूंचे समष्टी रूप आहेत’, असा पू. पात्रीकरकाकांचा भाव असतो. त्यांच्याशी बोलत असतांना प.पू. गुरुमाऊलीची प्रीती अनुभवता येते.
९ इ. साधकांच्या समवेत त्यांच्या कुटुंबियांनाही होणार्या त्रासांवर नामजपादी उपाय सांगून साहाय्य करणारे साधकांचे अश्विनीकुमार म्हणजे पू. अशोक पात्रीकर ! : साधकांना त्रास होत असतांना पू. काका त्यांना त्वरित साहाय्य करतात. यातून पू. काकांचा प्रेमळ स्वभाव लक्षात येतो. पू. काका केवळ साधकांनाच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांनाही तितकेच साहाय्य करतात. एके दिवशी माझ्या सूनबाईच्या पाठीतून कळा येऊन तिला प्रचंड वेदना होत होत्या. रात्रभर तिला झोपही लागली नाही. आधुनिक वैद्यांना दाखवल्यावर त्यांनी ‘सायटिका’ (मांडी आणि पोटरी यांमधून जाणार्या शिरेचे दुखणे) असल्याचे निदान केले. मी पू. काकांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी मला लगेचच जप सांगितला. सूनबाईने तो जप श्रद्धेने केल्यावर ४ घंट्यांतच तिच्या वेदना थांबल्या.
९ ई. कर्तेपणा नसणे : साधकांना मंत्रजप सांगण्यापूर्वी पू. पात्रीकरकाका प.पू. गुरुमाऊलीला शरणागतभावाने प्रार्थना करतात. त्यांचा ‘मी हे उपाय किंवा मंत्रजप सांगत नसून परम पूज्यच सर्व करत आहेत’, असा भाव असतो.’
पू. पात्रीकरकाका हे विदर्भातील साधकांना लाभलेले परम पूज्यांचे प्रतिरूपच आहेत. त्यांचे वर्णन मी पामराने काय करावे ? केवळ कृतज्ञता आणि कृतज्ञताच !!’
(सर्व सूत्रांचा दिनांक ६.७.२०२२ आहे.)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |