प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणात जाकिर आणि शफीक यांना अटक !

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंध असल्यावरून अन्वेषण चालू !

जाकिर आणि शफीक

बेंगळुरू – कर्नाटकमध्ये २६ जुलै या दिवशी भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण कन्नड जिल्हा सचिव प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी जाकिर आणि शफीक यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंध आहे का, या दिशेने अन्वेषण चालू करण्यात आले आहे. प्रवीण यांची हत्या पी.एफ्.आय. आणि तिची राजकीय संघटना ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) यांनी केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

एन्.आय.ए. कडे अन्वेषण सोपवा ! – शोभा करंदलाजे

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे या हत्येचे अन्वेषण सोपवण्यात यावे’, अशी मागणी केली आहे.

हत्येमागे हिजाब वाद वाढवणार्‍या संघटना ! – गृहमंत्री ज्ञानेंद्र

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

दुसरीकडे कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी आरोप केला आहे की, ‘प्रवीण यांच्या हत्येच्या मागे राज्यात हिजाब वाद वाढवणार्‍या संघटनांचा हात आहे.’ ज्ञानेंद्र पुढे म्हणाले की, ही हत्या केरळ आणि कर्नाटक यांच्या सीमेजवळ झाली आहे. त्यामुळे हत्यारे हत्या करून केरळला पळून गेले असावेत. लवकरच त्यांना पकडण्यात येईल.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे कर्नाटकातील नेते प्रल्हाद जोशी यांनी हत्येमागे पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.