‘मी द्रौपदी मुर्मू यांना चुकून ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले !’

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचे निलाजरे स्पष्टीकरण

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (उजवीकडे)

नवी देहली – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी २७ जुलै या दिवशी संसदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अपमानित केल्यावर आता त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘देशाची क्षमा मागा’, ही भाजपची मागणी धुडकावत चौधरी म्हणाले की, मी चुकून मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले. आता तुम्हाला मला फाशी द्यायची असेल तर द्या. सत्ताधारी पक्ष अनावश्यक वाद घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या महिला खासदारांनी सभागृहात गदारोळ केला. ‘काँग्रेस गरीब आणि आदिवासी विरोधी आहे. स्वत:च्या चुकीसाठी क्षमा मागण्याऐवजी काँग्रेस कुरघोडी करत आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वतीने क्षमा मागावी. काँग्रेसने प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान केला आहे’, असे भाजपच्या खासदार आणि मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या. यानंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ‘चौधरी यांनी त्यांची चूक आधीच मान्य केली आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

गदारोळामुळे आतापर्यंत २४ खासदार निलंबित !

चालू अधिवेशनात महागाई आणि ‘वस्तू आणि सेवा कर’ या सूत्रांवरून विरोधक सातत्याने गदारोळ करत आहेत. यामुळे आतापर्यंत ४ लोकसभा खासदार आणि २० राज्यसभा खासदार यांना निलंबित करण्यात आले आहे.

काय म्हणाले होते अधीर रंजन चौधरी ?

२७ जुलै या दिवशी चौधरी यांना प्रसारमाध्यमांनी ‘तुम्ही राष्ट्रपती भवनात जात आहात ?’, असे विचारले असता, ते म्हणाले की, भारताच्या ‘राष्ट्रपत्नी’ सर्वांसाठी आहेत, आपल्यासाठी का नाही ?

संपादकीय भूमिका

  • राष्ट्रपतींविषयी संतापजनक विधान करणार्‍या खासदारांची खासदारकीच रहित केली पाहिजे !
  • देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीविषयी उघडपणे अशलाघ्य विधान करणारे नेते सर्वसमान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असे खासदार असणे जनतेला लज्जास्पद !