सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेमध्ये दिवंगत झालेल्या संतांचे मृत्यूत्तर विधी करण्यास सांगण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

मृत्यूत्तर विधींच्या ठिकाणी ठेवलेले (कै.) सौ. शालिनी मराठे यांचे छायाचित्र

‘२४ जुलै ते २८ जुलै या कालावधीत (कै.) सौ. शालिनी मराठेकाकूंचे मृत्यूत्तर विधी आश्रमात चालू होते. तेव्हा मृत्यूत्तर विधींच्या ठिकाणी (कै.) सौ. शालिनी मराठेकाकूंचे छायाचित्र ठेवले होते. ते पाहिल्यावर मला त्यातून पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता, चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींचे वातावरणात प्रक्षेपण झाल्याचे जाणवले. तेव्हा मला (कै.) सौ. शालिनी मराठेकाकूंच्या लिंगदेहाचे दर्शन झाले. हा लिंगदेह पिवळसर रंगाचा असून ‘तो जनलोकात आत्मानंद अनुभवत आहे’, असे मला जाणवले. (कै.) सौ. मराठेकाकूंच्या मृत्यूत्तर विधीच्या वेळचे वातावरण दु:खी किंवा उदासवाणे न वाटता ‘एका संतांचा सोहळा आहे’, असे मला जाणवत होते. यावरून असे लक्षात आले की, ‘(कै.) सौ. मराठेकाकू संत झाल्या आहेत आणि त्यांच्या लिंगदेहाला शिवात्म्याचे स्वरूप प्राप्त झालेले असून तो जनलोकात आनंदात आहे.’ त्यामुळे खरेतर त्यांच्यासाठी मृत्यूत्तर विधी करण्याची आवश्यकता नाही; परंतु सामाजिकदृष्ट्या विचार करून त्यांच्यासाठी धार्मिक विधी केले जात आहेत. त्यामुळे हे विधी करणारे (कै.) सौ. मराठेकाकूंचे यजमान श्री. प्रकाश मराठे यांना संतांसाठी हे विधी केल्यामुळे पुण्यफळ मिळून त्यांची समष्टी साधना होत आहे. त्याचप्रमाणे या धार्मिक विधींतून निर्माण होणारी सात्त्विकता आणि चैतन्य यांचा लाभ सनातनच्या ६० हून अल्प आध्यात्मिक पातळी असलेल्या काही दिवंगत झालेल्या आणि मृत्यूत्तर सद्गती न मिळालेल्या साधकांच्या लिंगदेहांना होऊन त्यांना पुढे सद्गती मिळणार आहे. अशा प्रकारे संतपद प्राप्त केलेल्या दिवंगत साधकांसाठी केलेल्या मृत्यूत्तर विधींचा लाभ समष्टी स्तरावर म्हणजे दिवंगत झालेल्या अन्य साधकांच्या लिंगदेहांना सद्गती देण्यासाठी होतो. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दिवंगत झालेल्या संतांचे मृत्यूत्तर विधी करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना सांगतात. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दूरदृष्टी, व्यापकता आणि समष्टीसाठीचा कल्याणकारी भाव दिसून येतो.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.७.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक