मी राष्ट्रपती होणे, हे माझे वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचे यश आहे ! – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

१५ व्या राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

नवी देहली – द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेतील ‘सेंट्रल हॉल’मध्ये पार पडलेल्या या शपथविधीला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली.

या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करतांना म्हणाल्या,

१. भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांना मला ही संधी मिळाली आहे. देश स्वातंत्र्याचे ५० वे वर्ष साजरा करत असतांना माझ्या राजकीय जीवनास आरंभ झाला होता. आज ७५ व्या वर्षात मला ही नवी संधी मिळाली आहे. हे दायित्व मिळणे माझे सौभाग्य आहे.

२. स्वतंत्र भारतात जन्म झालेली मी पहिली राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी नागरिकांकडून ज्या अपेक्षा केल्या आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला गतीने काम करावे लागणार आहे.

३. नगरसेविका ते देशाची राष्ट्रपती होण्याची संधी मला मिळाली आहे. ही भारताची महानता असून लोकशाहीची शक्ती आहे. यामुळेच एका गरीब घरात जन्मलेली मुलगी देशाच्या सर्वोच्च पदावर पोचू शकते. राष्ट्रपती होणे, हे माझे वैयक्तिक यश नसून ते भारतातील प्रत्येक गरिबाचे यश आहे.
४. पुढे वाटचाल करूया आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करूया !

कोरोनाकाळात भारताने संपूर्ण जगाला स्वत:समवेत पुढे नेण्याचे काम केले !

भारत आज प्रत्येक क्षेत्रात विकास करत आहे. कोरोना काळात भारताने त्याचे सामर्थ्य दाखवले. त्याने संपूर्ण जगाला स्वत:समवेत पुढे नेण्याचे काम केले. काही दिवसांपूर्वी आपण २०० कोटी डोस देण्याचा विक्रम केला आहे. या संपूर्ण लढ्यात भारताने दाखवलेला संयम आणि धैर्य, त्याची शक्ती अन् संवदेनशीलता यांचे प्रतीक आहे.