संभाव्य आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी जागतिक आस्थापनांकडून कर्मचारी कपात !

नवी देहली – गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत झालेल्या कोरोना महामारीतून  जग आर्थिकदृष्ट्या सावरू शकलेले नाही. ‘येणार्‍या काळात गेल्या अनेक दशकांतील सर्वांत मोठ्या जागतिक मंदीला सामोरे जावे लागू शकते’, असे म्हटले जात आहे. काहींच्या मते आर्थिक मंदी चालूही झाली आहे. गेल्या ५-६ मासांत जागतिक स्तरावरील मोठ्या आस्थापनांचे समभाग (शेअर्स) मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. यांमध्ये गूगल, अमेझॉन, अ‍ॅपल, फेसबूक, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला यांसारख्या जगातील दिग्गज आस्थापनांचा समावेश असून त्यांनी येणार्‍या मंदीचा सामना करण्यासाठी कर्मचारी कपात चालू केली आहे.

१. अल्फाबेट/गूगल : गूगलचे मुख्य आस्थापन असलेल्या ‘अल्फाबेट’ने नवी नोकरभरती न्यून केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी, ‘अन्य आस्थापनांप्रमाणे मंदीचा परिणाम आमच्यावरही होणार आहे’, असे म्हटले आहे. गूगलकडे आता १ लाख ६४ सहस्र कर्मचारी आहेत.

२. अ‍ॅमेझॉन : जगातील सर्वाधिक रोजगार देणार्‍या आस्थापनांमध्ये अमेझॉनचा समावेश होतो. मार्च २०२२ पर्यंत अमेझॉनमध्ये १६ लाख कर्मचारी होते. एप्रिल मासात आस्थापनाने म्हटले होते की, त्यांच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. यामुळे कामावर परिणाम होत आहे.

३. अ‍ॅपल : मंदीवर अ‍ॅपलने अद्याप अधिकृतपणे काही सांगितलेले नाही; पण ‘ब्लूमबर्ग’च्या एका अहवालानुसार मंदीचा सामना करण्यासाठी नव्याने भरती न्यून केली जात आहे. काही विभागातील खर्च न्यून करण्यावर विचार चालू आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत आस्थापनाकडे १ लाख ५४ सहस्र कर्मचारी काम करत होते.

४. मायक्रोसॉफ्ट : आस्थापनाने त्याच्या महत्त्वाच्या विभागांमध्ये नवी भरती न्यून करण्यात आल्याचे घोषित केले आहे. आस्थापनाने काही दिवसांपूर्वी कर्मचारी कपातही केली. वर्ष २०२१ च्या शेवटापर्यंत त्यांच्याकडे १ लाख ८१ सहस्र कर्मचारी होते.

५. टेस्ला : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांच्या मालकीच्या ‘टेस्ला’ने जून मासात २०० कर्मचार्‍यांना घरी पाठवले. मस्क यांनी स्वत: मंदीची शक्यता वर्तवली आहे. पुढील ३ मासांत १० टक्के कर्मचार्‍यांची नोकरी जाऊ शकते. वर्ष २०२१ च्या शेवटापर्यंत टेस्लाकडे १ लाख कर्मचारी होते.

इतिहासातील सर्वांत वाईट आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवा ! – मार्क झुकरबर्ग

फेसबूकचे मुख्य आस्थापन असलेल्या ‘मेटा’ने अभियंत्यांच्या भरतीमध्ये ३० टक्के कपात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग म्हणाले, ‘‘इतिहासातील सर्वांत वाईट आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची सिद्धता ठेवा !’’ या वर्षाच्या मार्चपर्यंत आस्थापनाकडे ७८ सहस्र कर्मचारी होते.